नवी दिल्ली - देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष आज आपला १३७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त दिल्लीतील मुख्यालयासह काँग्रेसच्या विविध कार्यालयांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या दिल्लीतील कार्यालयात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रम योग्य प्रकारे पार पडू शकला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याहस्ते ध्वजवंदन होत असताना ध्वजस्तंभावरून ध्वज खाली पडला. मात्र सोनिया गांधी यांनी प्रसंगावधान राखत ध्वज हातात झेलला आणि ध्वजाचा मान राखला.
काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष हे ध्वजवंदन करतात. दरम्यान, आज सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी सोनिया गांधी यांनी ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला असता. हा झेंडा ध्वजस्तंभावरून खाली पडला. मात्र सोनिया गांधी यांनी हा ध्वज प्रसंगावधान राखत झेलला. हा झेंडा योग्य प्रकारे बांधला न गेल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हातातच झेंडा फडकवला.
त्यानंतर कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना ध्वज फडकवण्यास सांगितले. त्यानंतर एका कार्यकर्त्याने पुढे येत ध्वजस्तंभावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अर्ध्यापर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर दुसरा कार्यकर्ता आला, त्याने झेंडा बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिडीही मागवण्यात आली.