नवी दिल्ली : पंजाबमध्येकाँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी हस्तक्षेप केला असून तीन सदस्यीय उच्चाधिकार समिती गठित केली आहे. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना या समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. खरगे यांच्यासह पंजाबचे प्रभारी हररीश रावत आणि दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जे. पी. अग्रवाल यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. खरगे यांनी शनिवारी समितीची एक बैठकही घेतली. पंजाबमधील समस्या चर्चेतून सोडविण्यात येईल आणि त्यासाठी एकता हाच मंत्र असल्याचे समितीतील एका सदस्याने लोकमतला सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि बंडखोरी करणारे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह आमदार आणि खासदारांना दिल्लीत बोलाविण्यात येणार आहे. समितीकडून त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून घेण्यात येतील. गटबाजी शमविण्यासाठी पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे किंवा सिद्धू यांना मंत्रिपद देऊन राज्यात क्रमांक दोनचे स्थान देण्याच्या प्रस्तावाबाबत विचारले असता तशी माहिती नसल्याचे जे. पी. अग्रवाल यांनी सांगितले. पंजाबमधील बंडखोरी शमविणे आवश्यकछत्तीसगडनंतर काँग्रेसचे दुसरे स्थिर राज्य आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सत्तांतर झाले होते. तसेच राजस्थानातही अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र, पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे वादळ शमविणे आवश्यक आहे. ही जाणीव असल्यानेच स्वत: सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आहे. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये मोठा गट सक्रिय झाला असून एकतेने लढल्याशिवाय निवडणुकीत यश मिळणार नाही, अशी भीती राज्यातील काँग्रेस नेत्यांना आहे.
पंजाबमधील गटबाजी सोडविण्यास सोनियांचा हस्तक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:30 AM