‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस पक्ष संपविणे नव्हे , अमित शहांची मल्लिनाथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:07 AM2018-06-12T06:07:33+5:302018-06-12T06:07:33+5:30
आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.
अंबिकापूर (छत्तीसगढ) : आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.
दोन दिवसांच्या छत्तीसगढ भेटीवर आलेले शहा म्हणाले की, भ्रमनिरास झाल्याने मध्यमवर्ग भाजपापासून दूर जात आहे, हा केवळ अपप्रचार आहे. यात तथ्य असते तर भाजपाने एकापाठोपाठ एक १४ राज्यांच्या निवडणुका जिंकल्या नसत्या. येथेही आमचे ‘मिशन ६५’ (८० पैकी ६५ जागा जिंकणे) नक्की यशस्वी होईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री रमण सिंग म्हणाले की, आमच्यावर जनता खूश आहे. भाजपाला चौथ्यांदा सत्ता देण्याचा इरादा मदारांनी केला आहे.
या दोन प्रश्नांवर काय म्हणाले भाजपाध्यक्ष?
1. तुम्ही ‘काँग्रेसमुक्त भारता’ची भाषा बोलता. म्हणजे तुम्हाला देशात कोणी विरोधी पक्षच असू नये असे वाटते का?
अमित शहा : आमच्या ‘काँग्रेसमुक्त भारता’चा संदर्भ काँग्रेस संस्कृती संपुष्टात आणण्याशी आहे, विरोधी पक्ष संपविण्याशी नाही. विरोधी पक्षाशिवाय लोकशाही असू शकत नाही. मात्र काँग्रेस जिवंत ठेवणे ही राहुल गांधींची जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा!
2. राहुल गांधी हे लोकशाहीला धोका आहेत, असे का मानता?
अमित शहा : लोकशाहीमध्ये कोणीही व्यक्ती वा पक्ष हा धोका नसतो. मी जे बोललो त्यात व्यक्तिगत टीका नाही. भाजपा अध्यक्ष या नात्याने मी जसा आमच्या कामगिरीचा लेखाजोखा देतो, तशी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनीही काँग्रेसच्या भल्याबुऱ्या कामांची जबाबदारी स्वीकारायला हवी. काँग्रेसने देशावर जसे ५५ वर्षे राज्य केले तसे नेहरू-गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनीही देशावर सत्ता गाजविली. त्या घराण्याचे वारस म्हणून या चार पिढ्यांचा हिशेब देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे.