काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 12:05 PM2024-01-03T12:05:29+5:302024-01-03T12:07:07+5:30
समितीने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या नऊ राज्यांमध्ये युती व्हावी, अशी शिफारस केली आहे.
आदेश रावल -
नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडीतील विविध घटक पक्षांशी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने आघाडी समिती स्थापन केली होती. ही समिती बुधवारी (दि.३) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल सादर करील.
समितीने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या नऊ राज्यांमध्ये युती व्हावी, अशी शिफारस केली आहे. या समितीने प्रथम प्रदेश काँग्रेस समित्यांशी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर कोणत्या जागा आवश्यक आहेत व कोणत्या जागा सोडता येतील, याबाबत सल्लामसलत करण्यात आली.
आता सविस्तर अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल इंडिया आघाडीतील घटकपक्षांशी जागावाटपावर चर्चा करतील.
काँग्रेसच्या या आघाडी समितीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, गुजरातचे प्रभारी महासचिव मुकुल वासनिक, बिहारचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश आणि सलमान खुर्शीद यांचा समावेश होता.