“बाहेरचा रस्ता दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पक्षातच राहणार”; G-21 नेत्यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:01 AM2022-03-17T08:01:50+5:302022-03-17T08:02:40+5:30

भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम असून, त्याच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे, असे या गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

congress g21 leaders made it clear that unless shown way of out we will stay in the party | “बाहेरचा रस्ता दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पक्षातच राहणार”; G-21 नेत्यांनी स्पष्टच सांगितले

“बाहेरचा रस्ता दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पक्षातच राहणार”; G-21 नेत्यांनी स्पष्टच सांगितले

Next

नवी दिल्ली: देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकीत सपाटून पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीतील पराभवाचे दीर्घ चिंतन करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधील असंतुष्ट गट असलेल्या जी-२१ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. यावेळी आम्हाला जोपर्यंत बाहेरचा रस्ता दाखवला जात नाही, तोपर्यंत पक्षातच राहणार आणि काँग्रेसचे कार्य करणार, अशी स्पष्ट भूमिका G-21 गटातील नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपविरोधात काँग्रेसला मजबुतीने उभे करणे काळाची गरज बनलेले आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम आहे. मात्र, त्याबाबतच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे. पक्षामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. जी-२१ गटाची आगामी भूमिका लवकरच स्पष्ट करण्यात येईल, असे या बैठकीनंतर काढलेल्या संयुक्त पत्रकात म्हटल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या असंतुष्ट असलेल्या जी-२१ गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

कपिल सिब्बलांचे आरोप अन् काँग्रेसचे प्रत्युत्तर

पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. या दोन गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी. काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले होते. यावर, ते एक चांगले वकील असू शकतात. परंतु चांगले नेते नाहीत. ते कधीही कोणत्याही गावात काँग्रेसचे काम करण्यासाठी गेले नाहीत. ते जाणूनबुजून पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाला कोणीही कमकुवत करू शकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा पलटवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

दरम्यान, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शंकर सिंह बघेला, शशी थरूर, संदीप दीक्षित, एम.ए.खान, विवेक तन्खा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पी.जे.कुरियन, राजिंदर कौल भट्टर, कुलदीप शर्मा आणि प्रेणित कौर या जी-२१ गटाच्या नेत्यांनी परिपत्रक काढले आहे. निवडणूक निकालांनंतर काँग्रेसच्या जी-२१ गटाच्या नेत्यांची ही दुसरी बैठक होती.
 

Web Title: congress g21 leaders made it clear that unless shown way of out we will stay in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.