नवी दिल्ली : उत्तराखंडमधील राजकीय संकट कायम असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी २५ एप्रिलपासून सुरूहोणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची निंदा आणि त्यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि उपनेते आनंद शर्मा यांनी दिलेल्या या नोटीसमध्ये राज्यात लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा आरोप लावून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नियम २६७ अंतर्गत देण्यात आलेल्या या नोटिशीत मोदी सरकारची निंदा करणारा प्रस्ताव पारित करण्याचीही विनंती केली आहे. सोमवारपासून काँग्रेसची पदयात्राडेहराडून : विविध राज्यांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पदच्युत करण्याच्या केंद्राच्या कुटील डावाचा निषेध नोंदविण्याकरिता सोमवारपासून राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यासोबतच माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात येणार आहे. जवळपास २०० ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची सूचना करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)