निरुपमांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या नेत्याला संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 07:39 PM2024-04-08T19:39:26+5:302024-04-08T19:41:52+5:30
राज्यात काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीत समाविष्ट असणारे माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसने नुकतीच पक्षातून हकालपट्टी केली.
Congress ( Marathi News ) : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राज्यातील वातावरणही ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरा जात आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीत समाविष्ट असणारे माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसने नुकतीच पक्षातून हकालपट्टी केली. या पार्श्वभूमीवर आज निरुपम यांच्या जागी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिल्यानंतर सचिन सावंत यांनी एक्सवर पोस्ट लिहीत नेत्यांचे आभार मानले आहेत. "मला ही जबाबदारी दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माझे नेते राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल, रमेश चेन्निथला, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांचे मी आभार मानतो," असं सचिन सावंत यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
My sincere thanks to hon'ble Congress President @kharge ji, my leader @RahulGandhi ji, @kcvenugopalmp ji, @chennithala ji @bb_thorat ji and @VarshaEGaikwad ji for appointing me as a Star Campaigner of @INCIndia for the Lok Sabha elections in Maharashtra.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 8, 2024
It's an honour to be the… pic.twitter.com/phwhWLPiog
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोणा-कोणाचा समावेश?
काँग्रेसने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, रमेश चेन्निथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, इमरान प्रतापगढ़ी, माणिकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, विलास मुत्तेमवार, संजय निरुपम, नितीन राउत, अमित देशमुख, विश्वजीत कदम, कुमार केतकर, भालचंद्र मुंगेकर, अशोक जगताप, वसंत पुरके, मुजफ्फर हुसैन, अभिजीत वंजारी, अतुल लोढे, रामहरी रुपनवार, अशोक पाटिल, कन्हैया कुमार, पवन खेड़ा, अल्का लांबा, श्रीनिवास बी.वी आणि वरुण चौधरी यांचा समावेश आहे.