कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून रामनगरचं नाव बदलण्याची तयारी? भाजपा-जेडीएसकडून विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:30 AM2024-07-11T10:30:27+5:302024-07-11T10:31:26+5:30

Karnataka Politics News: कर्नाटकमधील रामनगर (Ramnagar) जिल्ह्याचं नाव बदलण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असून, या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारणाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षातील भाजपाकडून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे.

Congress government in Karnataka is ready to change the name of Ramnagar? Opposition from BJP-JDS  | कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून रामनगरचं नाव बदलण्याची तयारी? भाजपा-जेडीएसकडून विरोध 

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून रामनगरचं नाव बदलण्याची तयारी? भाजपा-जेडीएसकडून विरोध 

कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असून, या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारणाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षातील भाजपाकडून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. रामनगर जिल्ह्याच्या नावात राम असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण असं करण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही हे कदापि मान्य करणार नाही, असे भाजपाने म्हटले आहे. 

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी सांगितले की, रामनगर जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. ते रामनगर जिल्ह्याचा कधीही विकास करणार नाहीत. त्यांनी मेडिकल कॉलेजसुद्धा कनकपुरा येथे स्थलांतरीत केले आहे. लोक हे मान्य करणार नाहीत. तर माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटमध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा या जिल्ह्याचं नाव रामनगर करू, असे सांगितले. 

कर्नाटक सरकारमधील उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण असं करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याकडे पाठवला आहे. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. शिवकुमार आणि इतर काही जणांनी सिद्धारामैय्या यांच्याकडे एक पत्रक देत रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण करावं, अशी विनंती केली आहे.

रामनगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रकावर डी. के. शिवकुमार यांच्यासह १३ जणांनी सह्या केल्या आहेत. त्यामध्ये  परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी, बंगळुरू ग्रामीणचे माजी खासदार डी. के. सुरेश यांचाही समावेश आहे.  यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शिवकुमार यांनी सांगितले की, बंगळुरू शहराला असलेल्या जागतिक प्रतिष्ठेचा फायदा शहराजवळ असलेल्या रामनगर, मगदी, कनकपुरा, चन्नपटना आणि हरोहल्ली तालुक्यांना व्हावा हा नाव बदलण्याची मागणी करण्यामागचा उद्देश आहे. 

दरम्यान, भाजपा नेते शहजाद पुनावाला यांनी सांगितले की, सध्याच्या काँग्रेस पक्ष हा हिंदू धर्माचा द्वेश करतो. तसेच या पक्षाची रामविरोधी मानसिकता शिगेला पोहोचली आहे. आपण राम जन्मभूमी आंदोलनाला पराभूत केले, असा दावा राहुल गांधी यांनी हल्लीच केला होता. आता डी. के. शिवकुमार यांना रामनगर नाव नावडतं झालं आहे कारण ते श्री रामांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला. 

Web Title: Congress government in Karnataka is ready to change the name of Ramnagar? Opposition from BJP-JDS 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.