गुजरात काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली; 64 वर्षांनंतर राज्यात पक्षाचे अधिवेशन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:29 IST2025-02-21T18:29:24+5:302025-02-21T18:29:33+5:30

Congress Gujarat : गुजरातमध्ये 30 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.

Congress Gujarat: Congress gears up to capture Gujarat; Party convention in the state after 64 years | गुजरात काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली; 64 वर्षांनंतर राज्यात पक्षाचे अधिवेशन...

गुजरात काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली; 64 वर्षांनंतर राज्यात पक्षाचे अधिवेशन...


Congress Gujarat : एकामागून एक पराभवाचे धक्के सहन करत काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली आहे. या वर्षीच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक होत आहे, यासाठी काँग्रेसने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने गुजरात काबीज करण्याची योजनाही आखली आहे. 64 वर्षांनंतर गुजरातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन होणार आहे. एप्रिलमध्ये या कार्यक्रमाने विधानसभा निवडणुकीची तयारी औपचारिकपणे सुरू होईल.

गुजरातमध्ये 30 वर्षांपासून भाजपची सत्ता
गुजरातमध्ये जवळपास 30 वर्षांपासून काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. पक्षाने अनेक प्रयत्न करुनही त्यांना भाजपचा बालेकिल्ला जिंकता आला नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही निराशाजनक निकाल लागले. असे असूनही काँग्रेसने आतापासूनच मिशन 2027 अंतर्गत गुजरात काबीज करण्याची तयारी सुरू केली आहे. यापूर्वी 1961 मध्ये भावनगर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. आता 64 वर्षांनंतर पुन्हा अधिवेशन होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने गुजरातमधील प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. त्याची देशभरात चर्चाही होते. अशा परिस्थितीत गुजरात काबीज करणे काँग्रेससाठी सोपे असणार नाही. त्यांना यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. यासाठी येत्या 1-2 महिन्यांत काँग्रेस पुढील दोन वर्षांचा कार्यक्रम तयार करेल. पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे राज्यातील दौरेही वाढणार आहेत. 

काँग्रेस 1995 पासून सत्तेबाहेर
1995 पासून गुजरात विधानसभेत भाजप 100 हून अधिक जागा जिंकत आहे. 2017 मध्ये काँग्रेसने भाजपचा विजय रथ 99 वर रोखला होता. पण, 2022 मध्ये भाजपला 53 टक्के मतांसह 148 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला केवळ 17 जागा जिंकता आल्या. काँग्रेसला ज्या प्रकारे एकामागून एक पराभवांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. आता अधिवेशनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 

Web Title: Congress Gujarat: Congress gears up to capture Gujarat; Party convention in the state after 64 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.