25 जून, हा भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयाची किंमत असंख्य निष्पाप भारतीयांना चुकवावी लागली होती. 1975 साली याच दिवशी देशात आणीबाणी घोषित झाली होती. 25 जून 1975 रोजी लागू झालेली आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत अर्थात 21 महिने चालली. या आणीबाणीला आज ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतिहासाचा तो काळा अध्याय आजही लोकांच्या मनात जशाला तसा जिवंत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जून 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एका पाठोपाठ एक अशा चार पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.
"काँग्रेसनं मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केलं होतं" -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा दिवस त्या सर्व महान पुरुष आणि महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आणीबाणीला विरोध केला होता. काँग्रेसने कशा पद्धतीने आपले मूलभूत स्वातंत्र्य नष्ट केले होते आणि प्रत्येक भारतीय ज्या संविधानाचा आदर करतो त्या भारतीय संविधानाची कशी पायमल्ली केली होती, याची आठवण #DarkDaysOfEmergency आम्हाला करून देतो"
"काँग्रेसनं देशाचा तुरुंग बनवला होता" -पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या पोस्टमोध्ये म्हणतात, "तत्कालीन काँग्रेस सरकारने सत्तेवर टिकून राहण्यासाठी लोकशाही सिद्धांतांना धाब्यावर बसवून देशाचा तुरुंग केला होता. जे कुणी काँग्रेसला विरोध करेल त्याचा छळ केला जात होता. सर्वात कमकुवत वर्गाला निशाणा बनवले जाऊ शकेल, अशी धोरणं तयार करण्यात आली होती.
"माध्यमांच्या स्वतंत्र्यावर हल्ला" -तिसऱ्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले, ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या संविधानाप्रति प्रेम व्यक्त करण्याचा कुठलाही अधिकार नाही. हे तेच लोक आहेत, ज्यांनी अगणितवेळा कलम 356 लागू केले. माध्यमांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी विधेयक आणले गेले. संघराज्य नष्ट केले आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन केले.
"काँग्रेस संविधानाप्रति असलेला तिरस्कार लपवते" -पंतप्रधान मोदी आपल्या चौथ्या पोस्ट मध्ये म्हणतात, ज्या मानसिकतेने आणीबाणी लादण्यात आली, ती आजही त्या पक्षात जिवंत आहे. एढेच नाही तर, ते त्यांच्या प्रतिकात्मकतेतून संविधानाबद्दलचा अथवा राज्यघटनेबद्दलचा तिरस्कार लपवतात. मात्र, भारतीय जनतेने त्यांचे असे वागणे बघितले आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांना वारंवार नाकारले आहे," असेही मोदी म्हणाले.