नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या थकीत कर्जांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला दोषी ठरवतानाच आपल्या सरकारने थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले नसल्याचा दावा केला आहे. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना हे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला भूसुरुंगावर बसवून गेले होते, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
यावेळी मोदींनी बँकांमधून करण्यात आलेल्या बेसुमार कर्जवाटपावरही बोट ठेवले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर 2008 पर्यंत देशातील सर्व बँकांनी एकूण 18 लाख कोटींचे कर्जवाटप केले होते. मात्र 2008 पासून पुढच्या सहा वर्षांमध्ये हा आकडा वाढून 52 लाख कोटींपर्यंत पोहोचला. कर्ज घेऊन जा, नंतर मोदी येईल आणि रडारड करेल, असेच धोरण सुरू होते. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर जितके कर्ज दिले गेले, त्याच्या दुप्पट कर्जवाटप गेल्या सरकारच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दिले गेले," मात्र थकीत कर्जवसुलीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. थकबाकीदारांकडून पै पै वसूल केली जाईल. तसेच आमच्या सरकारच्या काळात अशा थकीत कर्जदारांना एक रुपयाचेही कर्ज दिले गेलेले नाही, असा दावाही मोदींनी केला.