या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान 

By विलास शिवणीकर | Published: April 18, 2024 05:58 AM2024-04-18T05:58:07+5:302024-04-18T05:58:10+5:30

राजस्थानात २५ पैकी १२ मतदारसंघांत १९ एप्रिल रोजी होणार मतदान 

Congress had lost all the seats in rajasthan, what will happen this time | या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान 

या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान 

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर
: राजस्थानात पहिल्या टप्प्यात २५ पैकी १२ लोकसभा मतदारसंघांत १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. गतवेळी भाजपने सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. यंदा या जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे. तर भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसचे नेतेही सरसावले आहेत. पहिल्या टप्प्यात जयपूर शहर, जयपूर ग्रामीण, बिकानेर, श्रीगंगानगर, अलवर, झुंझुनूं, सीकर, चूरू, भरतपूर, नागौर, दौसा आणि करौली-धौलपूर या मतदारसंघांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात भाजपचे उमेदवार पंतप्रधान मोदींची गॅरंटी देत मत मागताना दिसून येत आहेत. मतदारांनी भाकरी फिरविली  होती...

राजस्थानच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची कशी आवश्यकता आहे, हे भाजपकडून सांगितले जात आहे. राजस्थानात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाकरी फिरविली आणि काँग्रेसच्या हातून सत्ता भाजपकडे दिली. सत्ता गेल्याची निराशा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात दिसून येत आहे. तर राज्यात सत्ता आल्याने भाजपचे नेते, कार्यकर्ते यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

भाजपचा दरवेळी नवीन उमेदवार
अलवरमधून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून आमदार ललित यादव रिंगणात आहेत. भरतपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या ८ पैकी ६ जागांवर भाजपचे आमदार आहेत. येथून रामस्वरूप कोली हे भाजपचे उमेदवार आहेत. गत तीन निवडणुकींत भाजपने येथे दरवेळी नवीन उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसने येथून संजना जाटव यांना संधी दिली आहे. 

अशोक गेहलोत यांचे इमोशनल कार्ड 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे इमोशनल कार्ड वापरताना दिसत आहेत.
त्यांचे चिरंजीव वैभव हे जालोर सिरोहीमधून मैदानात आहेत. आपल्या मुलाला आम्ही जनतेकडे सुपूर्द करत आहोत.
त्याला कसे यशस्वी करायचे हे आता आपल्या हातात
असल्याची भावनिक साद ते घालत आहेत. 

मुख्यमंत्री शर्मा यांच्यापुढे आव्हान 
- राज्यातील सर्व जागा पुन्हा जिंकण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यापुढे आहे.
- अर्थात, राजस्थानातही भाजपच्या प्रचारात चेहरा पंतप्रधान मोदी यांचाच आहे. 

वसुंधरा राजे स्टार प्रचारक 
- भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या स्टार प्रचारक आहेत. 
- त्यांचे चिरंजीव दुष्यंत सिंह हे झालावाडमधून निवडणूक लढवीत आहेत. हा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे.

Web Title: Congress had lost all the seats in rajasthan, what will happen this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.