नवी दिल्ली - आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मास्र’ मानली जाणारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर जेट आज भारतभूमीवर सुखरूप उतरली. फ्रान्सहून तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून आलेल्या या पाच विमानांचं देशभरातून मनःपूर्वक स्वागत होतंय. भारताचं सामरिक सामर्थ्य राफेलच्या आगमनानं प्रचंड वाढलंय आणि स्वाभाविकच देशवासीयांचं मनोधैर्य उंचावलंय. मात्र, राफेलच्या आगमनानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला पहिल्या कराराची आठवण करुन देण्यात येत आहे. मात्र, ही आठवण करुन देताना, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याकडून चूक झाली. त्यानंतर, नेटीझन्सने त्यांना ट्रोल केलं.
राफेलच्या आगमनाने देशाचा ऊर अभिमानानं भरून आलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृतमधील एका राष्ट्रभक्तिपर सुभाषितातून राफेलचं स्वागत केलं. काँग्रेसनेही राफेलच्या भारतात दाखल झाल्याचे स्वागत आणि वायू दलाचे अभिनंदन केले आहे. मात्र, राफेलच्या किंमतीवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेलच्या जुन्या करारातील किंमतीची आठवण करुन दिली. काँग्रेसने एका राफेल विमानाची किंमत 746 रुपये ठरवली होती. मात्र, संसद आणि संसदेबाहेरही सातत्याने विचारणा केल्यानंतरही चौकीदार महोदयाने राफेलच्या खरेदीबाबत माहिती दिली नाही. कारण, चौकीदाराची चोरी उघडी पडली आहे. चौकीदारजी अब तो उसकी किंमत बतोओ... असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले. मात्र, 746 कोटी लिहिण्याऐवजी केवळ 746 रुपये लिहिल्याने दिग्विजयसिंह यांना नेटीझन्सने ट्रोल केलंय. त्यानंतर, सिंह यांनी पहिले ट्ट्विट रिट्विट करुन चुकीबद्दल खेद व्यक्त करत 746 कोटी रुपयांना १ असे म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय वायू दलाचं अभिनंदन करत, मोदी सरकारला ३ प्रश्न विचारले आहेत. भारत सरकार या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल का, असे राहुल यांनी म्हटलंय.
526 कोटी रुपयांचं राफेल विमान 1670 कोटी रुपयांना का खरेदी केलं?126 ऐवजी केवळ 36 राफेल विमानंच का खरेदी करण्यात येत आहेत?HAL ऐवजी दिवाळखोर अनिल यांस 30 हजार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलंय?
असे तीन प्रश्न राहुल गांधींनी विचारले आहेत. राफेल खरेदीवरुन यापूर्वीही काँग्रेसने मोदी सरकारला संसंदेत प्रश्न विचारले होते. तसेच, या खेरदीत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.