"राजीव गांधी फाउंडेशनसाठी काँग्रेसने मेहूल चोक्सीकडून घेतली होती देणगी’’ भाजपाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 05:21 PM2020-06-27T17:21:33+5:302020-06-27T17:49:42+5:30
राजीव गांधी फाऊंडेशनसाठी काँग्रेसने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मेहूल चोक्सीकडून देणगी स्वीकारली होती, असा गंभीर आरोप आज भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे.
नवी दिल्ली - राजीव गांधी फाऊंडेशनवरून सध्या भाजपाकडूनकाँग्रेसवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, या राजीव गांधी फाऊंडेशनसाठी काँग्रेसने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मेहूल चोक्सीकडून देणगी स्वीकारली होती, असा गंभीर आरोप आज भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे. तसेच मेहूल चोक्सी आणि राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये नेमके काय संबंध आहेत, याचा खुलासा व्हायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राजीव गांधी फाऊंडेशनवर गंभीर आरोप करताना भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेसने राजीव गांधी फाऊंडेशनसाठी मेहूल चोक्सीकडून का देणगी घेतली होती. तसेच त्याला कर्ज का दिले होते. मेहूल चोक्सीने राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी का दिली होती आणि मेहूल चोक्सी आणि राजीव गांधी फाऊंडेशन यांच्याता काय संबंध होते हे देशासमोर आले पाहिजे.’’ पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला मेहूल चोक्सी सध्या भारतातून फरार आहे.
Why did you take donation in Rajiv Gandhi Foundation from Mehul Choksi and give loan to him? The country wants to know as to why the foundation took money from Mehul Choksi and what is the relation between Mehul Choksi and Rajiv Gandhi Foundation?: BJP Chief JP Nadda pic.twitter.com/1V0zABLdPA
— ANI (@ANI) June 27, 2020
तसेच राजीव गांधी फाऊंडेशनने कॅगच्या ऑडिटिंगला नकार का दिला. ही संस्था आरटीआयअंतर्गत का येऊ शकत नाही, ही माहिती समोर आली पाहिजे, अशी मागणीही नड्डा यांनी केली. नड्डा यांनी काल पंतप्रधान मदत कोषातील निधीही राजीव गांधी फाऊंडेशनकडे वळवण्यात आला होता, असा आरोप केला होता.
People of India want to know that why the accounts of Rajiv Gandhi foundation refused for the CAG auditing? Why was RTI not applicable to the foundation?: BJP Chief Jagat Prakash Nadda pic.twitter.com/ygLpHHLdpc
— ANI (@ANI) June 27, 2020
दरम्यान, भाजपाने यापूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून देणगी मिळाल्याचा आरोप केला होता. चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला फंडिंग होत आहे. चीनचं इतकं प्रेम कसं वाढलं. काँग्रेस कार्यकाळातच चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता.
याबाबत रविशंकर प्रसाद म्हणाले की, कायद्यानुसार कोणत्याही पक्षाला सरकारच्या परवानगीशिवाय परदेशी पैसे घेता येऊ शकत नाही. मग चीनकडून येणाऱ्या या पैशासाठी काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का? हे स्पष्ट करावं. २००५-०६ मधील राजीव गांधी फाऊंडेशनच्या डोनरची यादी आहे. यात चीनच्या एम्बेसीकडून डोनेशन मिळाल्याचं स्पष्ट लिहिलं आहे. असं काय झालं? का गरज भासली? यात अनेक उद्योगपतींची, पीएसयू यांची नावे आहेत. इतकं असतानाही चीनच्या एम्बेसीकडून पैसे घ्यावे लागले असे त्यांनी सांगितले.