महागाईविरोधात काँग्रेसच्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी "द्वेषाचा जन्म भीतीतून होतो. जो घाबरतो तो द्वेष निर्माण करतो. भाजपा आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करतात आणि जाणूनबुजून देशात द्वेष आणि भीती निर्माण करतात. हा द्वेषच भारताला कमकुवत करत आहे" असं म्हटलं आहे. महागाई, बेरोजगारी ही द्वेषापेक्षा मजबूत असते का? नरेंद्र मोदी आणि भाजपा देशाला कमकुवत करण्याचे काम करत आहेत. आम्ही द्वेष नष्ट करतो आणि जेव्हा भीती कमी होते तेव्हा भारत पुढे जातो असं म्हटलं आहे.
"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात"
"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, पण त्या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले"
राहुल गांधी यांनी "यूपीए सरकारने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले होते, पण मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले आहे. पीठ, डाळी, पेट्रोल, तेलापासून सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतात सामान्य नागरिक संकटात आहेत, देश त्रस्त आहे. काँग्रेसने 70 वर्षांत एवढी महागाई दाखवली नाही. देशाला काँग्रेसच वाचवू शकते" असं देखील सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.