जयपूर : राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. त्यामुळे बहुजन समाज पार्टी व काही अपक्ष यांच्या पाठिंब्यावरच काँग्रेसचे सरकार बनणार, हे स्पष्ट झाले आहे.मतमोजणी आटोपताच काँग्रेस विधिमंडळाची बैठकही जयपूरमध्ये पारही पडली. राज्याचा मुख्यमंत्री ़निवडल्यानंतर गुरुवारीच शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र होणाऱ्या मुख्यमंत्र्यासाठी हे सरकार चालवणे तारेवरील कसरतच असेल.राजस्थानच्या सरकारमध्ये बहुजन समाज पार्टीचा एक मंत्री असणार, हेही नक्की ठरले आहे. बसपाने पाठिंबा जाहीर केला आहेच. तिथे त्या पक्षाचे सहा आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसचे चार बंडखोरही निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनाही खुश ठेवण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागेल.राजस्थानातील स्थिती चांगली नाही, हे लक्षात येताच, काहीही करून पुन्हा सत्तेत येण्यास भाजपा व अमित शहा यांनी जंगजंग पछाडले होते, हेही विसरून चालणार नाही. त्यात भाजपा थोडासा जरी कमी पडला असता, तर काँग्रेसची संख्या १२0 झाली असती.सत्तेत येण्याची लक्षणे दिसू लागताच काँग्रेस पक्ष प्रचारात मागे पडला. भाजपाने अचानक प्रचारात बाजी मारल्यामुळे फासे पलटण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. पण राहुल गांधी यांना त्याचा अंदाज आला. त्यांनी लगेचच वॉर रुम स्थापन करून, तिथे थेट अहमद पटेल यांनाच बसवले. त्याचा मोठा फायदा झाला.
राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:29 AM