"अग्निपथ योजना, नोटाबंदीसारखा निर्णय; नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन...", काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 02:16 PM2022-06-18T14:16:09+5:302022-06-18T14:21:22+5:30
Congress PC on Agnipath Scheme : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत.
नवी दिल्ली : लष्करातील भरतीबाबत अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) देशात गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत. दरम्यान, अग्निपथ योजनेबाबत काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेस नेते प्रमोद तिवारी (Pramod Tiwari), पवन खेरा (Pawan khera) आणि युवा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेवर जोरदार टीका केली आहे. अग्निपथ योजना हा नोटाबंदीसारखा निर्णय आहे. विचार न करता धोरणे बनवून पंतप्रधान जनतेसोबत खेळत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा म्हणाले. तसेच, अग्निपथ योजना तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी अग्निपथ योजनेचे वर्णन "नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन बिना डायरेक्शन" असे केले आहे. तसेच, आर्थिक बचतीसाठी तरुणांना शहीद करणार का? असा सवाल त्यांनी केला. याशिवाय, आपला हक्क मागणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला जात आहे. ही योजना मागे घ्या. अखेर, किती तरुणांच्या हौतात्म्यानंतर तुम्ही सहमत होणार? असाही सवाल प्रमोद तिवारी यांनी केला.
याचबरोबर, बिहारमधील बेरोजगारीचा दर दुप्पट आहे. तरुणांकडून संधी हिसकावून घेतल्या जात आहेत, असे काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार म्हणाले. तसेच, केंद्र सरकारवर टीका करताना कन्हैया कुमार म्हणाले, पंतप्रधान आम्हा लोकांना पिंजऱ्यात ठेवलेले उंदीर समजतात. हा देश गांधींचा देश आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात लष्कर भरतीच्या आंदोलनाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले. यासोबतच, कन्हैया कुमार यांनी तरुणांना हिंसा आणि जाळपोळ न करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, सरकारने ही योजना लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.