नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेल्या हरिश रावत (Congress Harish Rawat) यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाविरोधात आघाडी उघडली आहे. काही दिवसांपूर्वी रावत यांनी एका पाठोपाठ एक केलेल्या ट्विटमुळे उत्तराखंडकाँग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. यानंतर आता पुन्हा एकदा हरिश रावत यांनी एक विधान केलं आहे. आपण काँग्रेस पक्षाची बालिका वधू असल्याचं म्हटलं आहे. तसेच "काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन" असं देखील म्हटलं आहे. पक्षाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपण मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी सांगतो असं ते म्हणाले आहेत.
हरिश रावत हे आजतकच्या पंचायत आजतक उत्तराखंड 2021 कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. रावत यांना आम आदमी पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असं विचारला असता ते म्हणाले की, "मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाने मला काही दिलं, नाही दिलं तरी मी माझ्या मनातील गोष्ट परखडपणे सांगतो. माझ्या सुरक्षेसासाठी मला कुठे जाण्याची गरज नाही. जेव्हा कधी मी माझ्या नेतृत्वासमोर उभा राहिलो माझी राजकीय सुरक्षा परत मिळाली. त्यामुळे माझा बालिका वधूचा जो स्टेटस आहे, तो मी का सोडेन? फक्त एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी?. ज्यांनी ही अपेक्षा केली त्यांच्यात अजूनही काही लोक आहेत. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. पण काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन."
"उत्तराखंडमधील विविधता समजून घेण्यासाठी पाच ते सात वर्ष तपश्चर्या करावी लागेल"
निवडणुकीच्या तयारीवरही हरिश रावत यांनी भाष्य केलं आहे. "ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहोत तिथे विरोधकांनी सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभागासारख्या मगरींचा सामना करावा लागत आहे. आम्हाला समुद्रात पोहत त्यांच्याशी लढा द्यावा लागत आहे" असं म्हटलं आहे. तसेच रावत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना देखील एक सल्ला दिला आहे. उत्तराखंडमधील विविधता समजून घेण्यासाठी पाच ते सात वर्ष तपश्चर्या करावी लागेल असं म्हटलं आहे.
रावत यांच्या ट्विटनंतर काँग्रेसमध्ये खळबळ
माजी मुख्यमंत्री असलेल्या हरिश रावत यांनी "अजबच गोष्ट आहे ना, निवडणूक रूपी समुद्रात पोहायचे आहे. सहकार्यासाठी संघटनेची चौकट बहुतांश ठिकाणी पाठ फिरवून उभी आहे, किंवा नकारात्मक भूमिकेमध्ये आहेत. ज्या समुद्रात पोहायचे आहे. ज्यांच्या आदेशावर पोहायचे आहे. त्यांचे हस्तकच माझे हात-पाय बांधत आहेत. मनामध्ये खूप वेळा विचार येतो की, हरिश रावत आता खूप झालं. खूप पोहून झालं. आता आरामाची वेळ आलीय" असं ट्विटमध्ये लिहिलं होतं. रावत यांच्या ट्विटनंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.