ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांच्यात भेट झाल्याच्या वृत्ताचा इन्कार करणा-या काँग्रेसने अखेर आपल्या भूमिकेवरुन यू टर्न घेतला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याचे काँग्रेसने मान्य केले आहे. राहुल गांधी यांनी फक्त चीनच नव्हे तर, भूतानचे राजदूत आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांची भेट घेतली असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले. विविध देशांचे राजदूत वेळोवेळी काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची भेट घेत असतात अशी सारवासारव सूरजेवाला यांनी केली.
शनिवारी राहुल गांधींनी लुओ झुओई यांच्या भेट घेतल्याच्या बातम्या येत होत्या. सुरुवातीला काँग्रेसने हे वृत्त खोटं असल्याचं सांगत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे दिल्लीमधील चीनी दुतावासाने यासंबंधी आपल्या वेबसाईटवर (http://in.china-embassy.org) टाकलेलं स्टेटमेंट नंतर डिलीट करुन टाकल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं होतं.
आणखी वाचा
राहुल गांधी यांनी लुओ झुओई यांची भेट घेत सध्या भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन सुरु असलेल्या वादावर चर्चा केल्याचं सांगण्यात येत होतं. काँग्रेसने मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं.
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्टिवरच्या माध्यमातून आरोप केला आहे की, "काही न्यूज चॅनेल्स राहुल गांधी आणि लुओ झुओई यांच्यात भेट झाल्याच्या खोट्या बातम्या चालवत आहेत". या बातम्या परराष्ट्र मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणांकडून पेरण्यात आल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख राम्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्यासोबत झालेल्या भेटीत सीमारेषेचा मुद्दा का उपस्थित केला नाही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं होतं. इतकंच नाही तर राहुल गांधी जर चीनी राजदूताला भेटले असतील तर त्यात मला काही वादासारखं दिसत नाही असंही त्या बोलल्या होत्या.
Envoys met Rahul Gandhi ji, not only Chinese envoy but also Bhutanese envoy and ex NSA Shiv Shankar Menon: RS Surjewala— ANI (@ANI_news) July 10, 2017
Various ambassadors and envoys keep meeting Congress President and Vice President time to time on courtesy basis: RS Surjewala,Congress pic.twitter.com/7h0dqwzL83— ANI (@ANI_news) July 10, 2017