काँग्रेसचा सदैव ८५ टक्के कमिशनचा इतिहास राहिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसच्या टीकेवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 10:23 AM2023-05-07T10:23:24+5:302023-05-07T10:23:41+5:30
भाजपाचे डबल इंजिन सरकार भेदभावरहित विकास करण्यासाठी काम करीत आहे.
बदामी (कर्नाटक) : भाजपाचे डबल इंजिन सरकार भेदभावरहित विकास करण्यासाठी काम करीत आहे. याउलट काँग्रेसचा इतिहास ८५ टक्के कमिशनचा राहिला आहे. काँग्रेस लोकांच्या सेवेसाठी कधीही काम करणार नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या टीकेवर पलटवार केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी शनिवारी बंगळुरूमध्ये एक रोड शो केला. नंतर बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ते बोलत होते.
मोदी यांनी सांगितले की, २५ किलोमीटर रोड शो दरम्यान लोक रस्त्यांच्या दोन्ही बाजूला आपल्या परिवारासह उभे होते. यात लहान मुलांसह महिला होत्या. दिव्यांग होते. लोकांत प्रचंड उत्साह होता. मी बंगळुरूत जे पाहिले, त्यावरून सांगू शकतो की, येथे भाजपाचे नेते अथवा आमचे उमेदवार निवडणूक लढतच नसून कर्नाटकचे लोकच भाजपाच्या वतीने लढत आहेत.
काँग्रेस हिंदूंच्या श्रद्धेची थट्टा : योगी आदित्यनाथ
कोप्पा : काँग्रेसने बजरंग दलावर बंदीचा प्रस्ताव देऊन हिंदूंच्या श्रद्धेची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केली. तथापि, बहुसंख्य समुदाय ते सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कर्नाटकातील चिक्कमगलुरू जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले की, ते उत्तर प्रदेशातील रामाच्या भूमीतून हनुमानाच्या भूमीत (कर्नाटक) आले आहेत.
काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना भुलू नका
काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना भुलू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी हावेरी येथे आयोजित जाहीर सभेत केले. त्यांनी सांगितले की, खोटी आश्वासने देण्यात काँग्रेस पटाईत आहे. काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी गरिबी हटाव’चा नारा दिला होता. हा इतिहासातील सर्वांत मोठा खोटारडेपणा होता. हा खोटारडेपणा काँग्रेसकडून अजूनही सुरूच आहे.
मोदी यांनी सांगितले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस शिव्या आणि असत्य याचा आसरा घेत आहे. याचे उत्तर १० मे रोजी मतदारच देतील. ओबीसी, लिंगायत आणि इतर समुदाय काँग्रेस नेत्यांच्या शिव्यांमुळे चिडलेले आहेत. त्यांचा रोष आता भाजपाला पूर्ण बहुमताने सत्ता देण्याच्या निर्धारात रूपांतरित झाला आहे.