काँग्रेस बाबासाहेबांसोबत कशी वागली, हे आपण विसरायला नको. बाबासाहेब जोपर्यंत जिवंत होते, काँग्रेसने त्यांचा अपमान केला. त्यांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत केले. काँग्रेसने त्यांच्या स्मृती पुसून टाकण्याचाही प्रयत्न केला. काँग्रेसने बाबासाहेबांचे विचार नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. डॉ बाबासाहेब अंबेडकर हे संविधानाचे रक्षक होते, मात्र काँग्रेस संविधानची भक्षक बनली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी (१४ एप्रिल) हिसार ते अयोध्येसाठी व्यावसायिक विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला आणि हिसारमधील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. या दरम्यान ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "काँग्रेस देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले. काँग्रेस नेते स्विमिंग पूलसारख्या सुख-सुविधांचा आनंद घेत होते. मात्र, गावांतील प्रति १०० घरांमागे केवळ १६ घरांनाच पाईपने पाणीपुरवठा होत होता. याचे सर्वाधिक नुकसान एससी, एसटी आणि इतर मागासवर्गीयांनाच झाले. आज जे गल्ल्या-गल्ल्यांत जाऊन भाषणे देत फिरत आहेत. त्यांनी किमान आपल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय बांधवांच्या घरी पाणी तरी पोहोचवायला हवे होते."
पंतप्रधान मोदी यांनी वक्फ कायद्यावरून काँग्रेसवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसने केवळ काही कट्टरपंथीयांनाच खूश केले. उर्वरित समाज दयनीय, अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या या वाईट धोरणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वक्फ कायदा." एवढेच नाही तर, काँग्रेस एखाद्या मुस्लीम नेत्याला अध्यक्ष का बनवत नाही? असा सवालही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला केला.
मोदी म्हणाले, "कर्नाटक सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि मागास वर्गाचे अधिकार काढून घेत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले. मात्र, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही, असे बाबा साहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या लांगुलचालनाच्या राजकारणाने मुस्लीम समाजाची मदत नव्हे, तर नुकसानच केले आहे."