नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्यासाठी बेशरम झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ज्या लोकांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना यापूर्वी 18 हजार रुपये कर भरावा लागत होता. आता 5 हजार रुपये भरावा लागत आहे. तसेच भविष्यात आयकर भरण्याचा स्लॅब 10 वरून 5 टक्के करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. वरिष्ठ नागरिकांसाठी टॅक्सही कमी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
मध्यम वर्गाला आपले घर खरेदी करणे कठीण बनत होते. आता ते स्वप्न पुर्ण करणे सोपे झाले आहे. गृह कर्जासाठी पुर्वी 10 टक्के व्याज द्यावे लागत होते, आता ते 8.75 टक्क्यांवर आले आहे. यामुळे लोक वर्षाला 35-40 हजार रुपये वाचवत आहेत. तसेच इतरही कर्जे स्वस्त झाली आहेत. महत्वाचा म्हणजे मोबाईल डेटास्वस्त झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी राहुल गांधी यांच्या सरदार वल्लभ भाई पटेलांच्या पुतळ्यावरील वक्यव्याचा समाचार घेतला. काँग्रेस पक्ष खोटे दावे खपविण्यासाठी निर्लज्जपणाचा आधार घेत आहे. काँग्रेसने पटेल यांची आजपर्यंत आठवणही काढली नाही, देश त्यांचा सन्मान करत आहे, तर काँग्रेसला ते चालत नाहीय, असा आरोपही त्यांनी केला.