नवी दिल्लीः लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाचं आणि गळाभेटीचं राजकीय वर्तुळात कौतुक होतंय. परंतु, या भाषणानंतर दोन दिवसांनी राहुल गांधींनी केलेलं भाषण काँग्रेसला ट्विटरवरून काढून टाकावं लागलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भीतीने त्यांनी हे सावध पाऊल टाकल्याचं समजतं.
भाजपाची सरकारं राज्यांच्या तिजोरीतील पैसे चोरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थांना देत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. जेव्हा भाजपा सत्तेत येते, तेव्हा त्या-त्या राज्यातील संघाच्या हजारो संस्थांना बळकटी येते, नवचैतन्य मिळतं, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. या भाषणाचा व्हिडीओ काँग्रेसनं यू-ट्युब आणि ट्विटरवर अपलोड केला होता. परंतु, त्यातील आरोप ऐकून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खवळू शकतात आणि राहुल गांधींना पुन्हा मानहानीच्या खटल्याला सामोरं जावं लागू शकतं, अशी शंका येताच त्यांनी हे व्हिडीओ काढून टाकले आहेत.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर गांधीहत्येचा आरोप केला होता. त्यावरून त्यांच्यावर मानहानीचा खटला सुरू आहे. त्यात आणखी एकाची भर नको म्हणून काँग्रेसनं हे व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकल्याचं समोर आलंय. परंतु, हा व्हिडीओ आपल्या कामाचे आहेत, ही गोष्ट या निमित्ताने भाजपा-संघाच्या लक्षात आलीय. त्यामुळे हे व्हिडीओ मिळवून ते राहुल यांना लक्ष्य करू शकतात.
भाजपा, संघाकडून शिका!
दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींनी भाजपा, संघावर टीकास्त्र सोडलंच; पण त्यांच्याकडून शिकण्याचा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला होता. सर्वसामान्य लोकांमध्ये जा आणि काम करा. भाजपा-आरएसएस जनतेमध्ये जाऊन कामं करतात, मात्र आपले नेते काम करताना संकोच बाळगतात. भाजपा आणि आरएसएसकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.