भोपाळ - मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघ्या आठवड्या भराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी काँग्रेसने बंडखोरांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऐन मतदानापूर्वी पक्षविरोधी भूमिका घेत समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या मुलाचा प्रचार करण्याची घोषणा करणारे ज्येष्ठ नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांचीही काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आतापर्यंत एकूण 17 नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र सत्यव्रत चतुर्वेदी यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पक्षाचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेशमध्ये पक्षातिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी करून आपल्याच पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. या बंडखोरांची नाराजी दूर करताना तसेच त्यांच्यावर कारवाई करताना दोन्ही पक्षांच्या नाकी नऊ येत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते आणि महासचिव म्हणून काम पाहणाऱ्या सत्यव्रत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे मुलासाठी तिकिटाची मागणी केली होती. मात्र त्याला तिकीट नाकारण्यात आले. दरम्यान, सत्यव्रत चतुर्वेदी यांनी पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले होता. चतुर्वेदी यांची समजूत घालण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र त्यात फारसे यश आले नव्हते.
चतुर्वेदी यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या मुलाचा प्रचार करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. काँग्रेसचे आठ नेते इतर पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. तर 12 जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरांचे मन वळविण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. असे असले तरी पक्षातील बंडखोर नेत्यांनी उज्जैन उत्तर, दक्षिण, झाबुआ, बालाघाट, महिदपूर येथे काँग्रेस उमेदवारांना अडचणीत आणले आहे.