मध्यप्रदेशात सट्टेबाजांचा कल काँग्रेसकडे; राहुल गांधी यांचा करिष्मा चालतो की काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:34 AM2018-11-22T05:34:46+5:302018-11-22T05:35:05+5:30
मध्यप्रदेशातील निवडणुकांना एक आठवडा राहिला असतानाच येथील राजकीय चित्र बदलले की काय, अशी शंका तिथे सुरू झालेल्या सट्ट्यावरून येत आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशातील निवडणुकांना एक आठवडा राहिला असतानाच येथील राजकीय चित्र बदलले की काय, अशी शंका तिथे सुरू झालेल्या सट्ट्यावरून येत आहे. गेल्या महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला भाजपालाच सत्ता मिळेल, यावर अधिक सट्टा लागत होता; पण भाजपाच्या विजयावर बोली लावणारे अनेक जण आता अचानक काँग्रेसच्या विजयावर बोली लावू लागले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला सट्टेबाजांचा कल भाजपाकडे दिसत होता. भाजपाला सहज बहुमत मिळेल, यासाठीच अधिक बोली लावली जात होती. पण मतदानाला एक आठवडा शिल्लक राहिला असताना, हवा बदलली आहे. भाजपापेक्षा काँग्रेस जिंकेल यावर अधिक सट्टा लावला जात आहे. राहुल गांधी यांचा करिष्मा चालतो की काय, असे वाटू लागले आहे.
सट्टेबाजांच्या अंदाजानुसार काँग्रेसला ११६ व भाजपाला १०२च्या आसपास जागा मिळतील. सट्टा बाजारातील अंदाज रोज बदलतात. त्यामुळे आजच्या सट्ट्यावर सट्टेबाज अवलंबून राहत नाहीत. (वृत्तसंस्था)