"भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा"; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:39 PM2024-08-28T17:39:16+5:302024-08-28T17:50:44+5:30

कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संताप व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने पलटवार केला आहे.

Congress has hit back after President Draupadi Murmu expressed anger over the Kolkata doctor case | "भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा"; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार

"भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा"; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार

Kolkata Doctor Rape And Murder Case : पश्चिम बंगालच्या कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. देशभरात या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आणि नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. दुसरीकडे, या प्रकरणाच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलने सुरु झाली आहेत. अशातच देशाच्या राष्ट्रपती द्रौपद्री मूर्मू यांनी याप्रकरणी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. समाजाला प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं. राष्ट्रपतींच्या या विधानावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. राष्ट्रपतींना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे.

कोलकाता येथी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी रुग्णालयातीलच एका आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यापासून पश्चिम बंगालमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालंय. या घटनेच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील रस्त्यावर उतरल्या होत्या. दुसरीकडे विद्यार्थी संघटनांनीही सरकार विरोधात आंदोलन केलं. आता या सगळ्या प्रकारावरुन राष्ट्रपती मुर्मू यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेने मी अस्वस्थ आणि भयभीत झाले असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं. त्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा असं म्हटलं आहे.

"आदरणीय अध्यक्ष महोदया, केवळ कोलकात्यातच नाही तर महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, यूपी आणि मध्यप्रदेशसह देशभरातील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांबाबत तुम्हाला सरकारला सल्ला देण्याची गरज आहे. मणिपूर आणि महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या घटनांकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पुढे येण्याची गरज आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. केवळ विरोधकांनाच नव्हे तर सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या डबल इंजिन सरकारांनाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा," असे पवन खेरा यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?

"कोणत्याही सुसंस्कृत समाजात बहिणी आणि मुलींवर असा क्रूरपणा होऊ दिला जाऊ शकत नाही. कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत आहेत. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बलात्काराच्या असंख्य घटना समाज विसरला आहे. समाज म्हणून आपला हा सामूहिक विस्मरण चिंतेचा विषय आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता आपण आत्मपरीक्षण करणे आणि चर्चा करणे महत्त्वाचे आहे. काही कठीण प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. अनेकदा 'विकृत मानसिकता' महिलांना कमी माणूस, कमी ताकदवान, कमी सक्षम, कमी हुशार म्हणून पाहते. डॉक्टर, विद्यार्थी आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार आणखी काही घटना घडवून आणण्यासाठी घातपातात करत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांवरील गुन्ह्यांची प्रकरणे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अशा घटना घडल्यानंतर घटना विसरत राहणे योग्य होणार नाही," असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
 

Web Title: Congress has hit back after President Draupadi Murmu expressed anger over the Kolkata doctor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.