नवी दिल्लीः 'सब का साथ, सब का विकास', 'न खाऊंगा न खाने दुंगा' ही नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणाबाजी निव्वळ ड्रामेबाजी होती, सत्ता मिळवण्यासाठी - खुर्ची मिळवण्यासाठी केलेली चाल होती, हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी काँग्रेसला संपवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सगळ्याचा वापर केला. पण सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस पक्ष कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असा निर्धार काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसच्या महाअधिवेशनात व्यक्त केला.
देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे आणि त्या जोरावर पक्ष पुन्हा भरारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अत्यंत आव्हानात्मक काळात राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असून व्यक्तिगत आशा-अपेक्षा, अहंकार दूर सारून सर्वांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही सोनिया गांधींनी केलं.
सोनिया गांधी म्हणाल्या,
>> काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर तो एक विचार आहेत. त्यात भारतीय संस्कृतीची प्रतिमा दिसते. काँग्रेसशी आपलं नातं अधिक दृढ करण्याची ही वेळ आहे.
>> देशाची दिशा, धोरण काँग्रेसने ठरवणं गरजेचं आहे, देशवासीयांच्या आशा-आकांक्षा जाणून काँग्रेसनं देशाच्या राजकारणाचा सूत्रधार झालं पाहिजे. >> ४० वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या दणदणीत विजयाने देशाच्या राजकारणाचं चित्र पालटून टाकलं होतं. काँग्रेस शक्तिशाली पक्ष ठरला होता. तशीच कामगिरी आपण येत्या काळात करू आणि राजकारणाला नवी दिशा मिळेल.
>> जे लोक देशाच्या राजकारणातून काँग्रेसचं अस्तित्वच मिटवू इच्छित होते, त्यांना लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल किती प्रेम आहे, याची जाणीव नाही.
>> मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं, पण परिस्थितीमुळे यावं लागलं. त्यानंतर, तुमच्या शक्तीच्या जोरावर आपण मोठं यश मिळवलं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली असाध्य ते साध्य करून दाखवलं.
>> कोट्यवधी जनतेच्या जीवनात बदल घडवणाऱ्या योजना आपण राबवल्या. पण आज या योजनांकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतंय, त्या कमकुवत करतंय.
>> गेल्या चार वर्षांत अहंकारी आणि सत्तांध सरकारने काँग्रेसला संपण्यासाठी खूप कारस्थानं केली. पण आम्हीच त्यांचा खोटेपणा आणि भ्रष्टाराच पुराव्यांसह जनतेपुढे उघड केला आहे.
>> ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार नाही, तिथे भाजपाचे अत्याचार सहन करूनही पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि कौतुक.