निवडणुकीत खर्च करायला काँग्रेसकडे पैसे नाहीत, कारण...; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 08:54 AM2024-03-14T08:54:51+5:302024-03-14T08:55:21+5:30
भाजपा विश्वासघातकी आहे, खोटं बोलते, खरे लपवते, लोकांमध्ये दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती पसरवते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन खरगेंनी जनतेला केले.
गुलबर्गा - काँग्रेस पक्ष आर्थिक संकटातून जातोय. ज्या बँक खात्यात लोकांकडून दान आलेले पैसे ठेवले होते त्याला भाजपा सरकारने फ्रिज केले. आयकर विभागाकडून काँग्रेसला दंड ठोठावला असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर केला असून आम्ही देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आगामी निवडणुकीत मजबुतीने उभे आहोत, त्यामुळे आम्हाला ताकद द्या असं आवाहन खरगेंनी लोकांना केले.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, हा आमच्या पक्षाचा पैसा होता जो लोकांनी देणगी म्हणून दिला होता. मात्र ती बँक खाती गोठवून ठेवण्यात आली. आता आमच्याकडे खर्च करायला पैसा नाही. तर भाजपा निवडणूक बाँन्डबाबत खुलासा करत नाही कारण त्यांची चोरी समोर येऊ शकते. त्यांची चुकीची कामे जनतेसमोर उघडी पडतील. त्यामुळे त्यांनी जुलैपर्यंत वेळ मागितला होता असंही त्यांनी म्हटलं.
तसेच तुम्ही अजून जिवंत आहात, जिवंत व्यक्तीचे स्मारक बनवले जात नाही. मात्र गुजरातमध्ये एका स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आलं. गुलबर्गातील लोकांनी आता निश्चय केला आहे. त्यांना त्यांची चूक सुधारायची आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्याचा इरादा जनतेने केला आहे असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
गुलबर्गामधून खरगे झाले होते पराभूत
२०१९ च्या निवडणुकीत गुलबर्गा जागेवरून मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक लढली होती परंतु ते निवडणूक हरले. भाजपाचे उमेश जाधव यांनी ९५ हजारांच्या मताधिक्यांनी खरगेंचा पराभव केला. गेल्या अनेक दशकांतील राजकीय जीवनात पहिल्यांदाच खरगेंना मात देण्यात आली. त्यात यंदा राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी आणि इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून भूमिका निभावणारे खरगे लोकसभेत उतरणार नाहीत. त्यांच्याऐवजी जावई राधाकृष्ण डोड्डामणि हे मैदानात उतरू शकतात.
"भाजपा संविधानाच्या विरोधात"
दरम्यान, भाजपा विश्वासघातकी आहे, खोटं बोलते, खरे लपवते, लोकांमध्ये दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती पसरवते त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांनी एकत्र राहिले पाहिजे, संविधान आणि लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे. जर संविधान, स्वातंत्र्य आणि एकता राहिली नाही तर देश गुलामगिरीत जाईल आणि तो पुन्हा उभा राहू शकत नाही असंही मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितले.