पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबतच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान झालेल्या ‘चुकी’वरून काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली. “काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात काही वजनही नाही,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.
राजस्थानला आता अशा अस्थिर सरकार आणि अनिश्चिततेपासून मुक्तीची गरज आहे. तरच राजस्थानमध्ये कायद्याचे राज्य स्थापित होईल आणि ते वेगाने विकासाच्या मार्गावर चालू शकेल, असे मोदी म्हणाले. दरम्यान, गहलोत यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील काही उतारे वाचले होते. याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. “मित्रांनो! चूक कोणाचीही होऊ शकते हे मला मान्य आहे. पण यावरून हेही दिसून येते की काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात कोणतंही वजन नाही,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
सभेला केलं संबोधितदौसा येथील धनावद येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या एका टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेला पंतप्रधानांनी संबोधित केलं. मोदी म्हणाले, “काँग्रेससाठी अर्थसंकल्प आणि घोषणा कागदावर लिहिण्यासाठी असतात. जमिनीवर योजना आणि कार्यक्रम राबविण्याचा काँग्रेसचा विचार नाही.” “त्यांनी काय वाचलं हा प्रश्न नाही, प्रश्न हा आहे की यापूर्वीचा वाचला… वर्षभर तो डब्ब्यात बंद करून ठेवला होता. यामुळेच ते झालं. आता राजस्थानला अस्थिर सरकारपासून मुक्ती हवी, अनिश्चिततेपासून मुक्ती हवी. राजस्थानला आता स्थिर आणि विकासाचं सरकार हवंय, तेव्हाच या ठिकाणी कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल,” असं मोदी म्हणाले.
उत्साह दिसून येतोयराजस्थानात डबल इंजिन सरकार पाहायला उत्साह दिसून येत आहे. चहुबाजूंना मला हे दिसत आहे. दौसामध्ये उत्साह दिसून येतोय, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी डबल इंजिनची पॉवर लागली असती तर इथला विकास किती जलद झाला असता. काँग्रेस आपणही काम करत नाही आणि करुही देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.