ऑनलाइन लोकमत
गाझीपूर, दि. १४ - मी ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर काँग्रेसचे नेते मला कुठल्या कायद्याच्या आधारे नोटा बंदीचा निर्णय घेतला म्हणून प्रश्न विचारत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या सत्ताकाळात चारआणे बंद केलेते. त्यावेळी तुम्ही कुठला कायदा लावलात. तुम्ही २५ पैशाच्या पुढे गेला नाहीत. तुम्ही तुमच्या बरोबरीचे काम केले. आम्ही ५०० आणि १ हजारच्या नोटा बंद करुन मी आमच्या बरोबरीचे काम केले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथील सभेत काँग्रेसवर बोचरी टीका केली.
काँग्रेसने १९ महिने देशात आणीबाणी लावली. या काळात तुमचे नेते, कार्यकर्त्यांनी जनतेचा पैसा हडप केला. संपूर्ण देशाला जेलखाना बनवून टाकला होता आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. सध्या गरीब, सर्वसामान्यांना जो त्रास होतोय त्यामुळे मलाही भरपूर वेदना होतायत. तुमचा त्रास कमी करण्यासाठी मला जे शक्य आहे ते सर्व मी करतोय. मला बदल घडवण्यासाठी फक्त ५० दिवस द्या अशी भावनिक साद त्यांनी जमलेल्या गर्दीला घातली.
पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले सीमेपलीकडे बनावट नोटा छापल्या जात होत्या. हा पैसा दहशतवाद, नक्षलवाद पसरवण्यासाठी वापरला जात होता. देशाविरोधात सुरु असलेला पैशाचा हा वापर थांबवणे आवश्यक होते त्यासाठी हा निर्णय घेतला असे मोदींनी सांगितले.
प्रत्येक भ्रष्टाचा-याच्या घरी जाऊन भ्रष्टाचार संपवणे शक्य नाही. त्यामुळे एकाचवेळी ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द करुन सर्वांना समपातळीवर आणले असे मोदी म्हणाले. कुठलेही काम असो त्रास हा होणारच फक्त तुमचा उद्देश प्रामाणिक असला पाहिजे. ज्यांच्या विरोधात हे सर्व करतोय ते शक्तीशाली आहेत. त्यांच्याकडे सरकार उलथवण्याची क्षमता आहे. पण मी सत्याचा, प्रामाणिकपणाचा मार्ग सोडणार नाही तुमचा आशिर्वाद माझ्याबरोबर आहे असे मोदींनी सांगितले.