नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरुन आणि प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत अॅमेझॉनवरून भेट म्हणून पाठवली आहे.
काँग्रेसने संविधानाची प्रत दिल्लीमधील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवली असून या प्रतची किंमत 170 रुपये आहे. अॅमेझॉनवरून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून संविधानाची प्रत पाठवल्याने 170 रुपये देखील नरेंद्र मोदी यांनाच भरावे लागणार आहे.काँग्रेसने ट्विट करुन प्रिय पंतप्रधान मोदीजी, तुम्हाला संविधानाची एक प्रत पाठवली आहे. लवकरच तुम्हाला ती मिळेल. देशामध्ये फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर कृपया संविधान नक्की वाचा असा टोलाही काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे, हे भाजपला अजून समजलेलं नसल्याची टीका काँग्रेसने भाजपावर केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला भाजपा काय प्रत्युत्तर देणार हे आगामी काळातचं समजणार आहे.