लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची सुरू झाली तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:26 AM2018-09-16T01:26:55+5:302018-09-16T01:27:16+5:30
निवडणुकीच्या तयारीसाठी स्थापन केलेल्या कोअर कमिटीची पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत आगामी लोकसभेचीही तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी स्थापन केलेल्या कोअर कमिटीची पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक झाली. यात आगामी विधानसभा, तसेच लोकसभा निवडणूक प्रचारात कोणत्या मुद्यांवर भर दिला जावा, जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत, प्रचार मोहीम कशी असावी, आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
सध्या जे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेपर्यंत जात आहे त्यातील अनेक जुने झाले आहेत, देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे, असे मत काही कमिटी सदस्यांनी यावेळी नोंदवले. या सदस्यांचे असे म्हणणे होते की, या निवडणुकांच्या प्रचारात थेट लोकांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित असलेल्या प्रश्नांना हात घातला पाहिजे. अशाच मुद्यांवर पक्षाने निवडणूक लढली पाहिजे. या बैठकीस पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे, सुष्मिता देव, आनंद शर्मा, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला आदी उपस्थित होते.