विरोधी मतांमध्ये फूट पाडून काँग्रेसची भाजपला मदत, अरविंद केजरीवाल यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:18 PM2019-03-05T16:18:20+5:302019-03-05T16:20:05+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.
काँग्रेसकडून आघाडी न झाल्याने आप नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. अरविंद केजरीवाल यांनी टिविट् करत संपुर्ण देश मोदी-शहा यांच्या जोडीला हरविण्यासाठी एकत्र येत असताना अशावेळी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचे काम करून एकप्रकारे काँग्रेस भाजपला मदत करत असल्याचे सांगितले. तसेच भाजप-काँग्रेसची छुपी युती झाली असल्याची अफवाही पसरत आहेत असा टोलाही लगावला. दिल्लीत भाजप-काँग्रेसच्या अनैतिक युतीशी लढण्यास आम्ही तयार आहोत, जनताही अशा अनैतिक युतीला हरवणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत स्पष्ट झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची आज बैठक घेतली या बैठकीत काँग्रेसने दिल्लीत एकला चलो रे चा नारा देत आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि आपची आघाडीची चर्चा सुरू होती. दिल्लीतील लोकसभेच्या एकूण 7 जागेपैकी प्रत्येकी 3-3 जागा काँग्रेस-आप लढू शकते तर 1 जागा अन्य एकाला दिली जाऊ शकते. अशारितीचा फॉम्युलाही समोर आला होता. मात्र दिल्ली काँग्रेसमध्ये आम आदमी पार्टीशी आघाडीबाबत मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर मंगळवारी दिल्लीतील नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठक घेतली. या बैठकीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित, काँग्रेसचे नेते अजय माकन तसेच दिल्ली काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस दिल्लीत सर्व 7 जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीतील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना खीळ बसणार हे नक्की.