वादामुळे काँग्रेस हायकमांड अशोक गहलोतांवर संतप्त, अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाद होणार, आता हे नेते शर्यतीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:05 AM2022-09-27T09:05:40+5:302022-09-27T09:09:41+5:30
Congress Politics: राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे हायकमांड असोक गहलोत यांच्यावर संतप्त झाले असून, त्यांच्याबाबत पक्षनेतृत्व मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निव़णुकीतून बाहेर होऊ शकतात.
नवी दिल्ली - बऱ्याच वर्षांनी होत असलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेच्या हायकमांडने ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांना अनुकूलता दर्शवली होती. मात्र राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे हायकमांड असोक गहलोत यांच्यावर संतप्त झाले असून, त्यांच्याबाबत पक्षनेतृत्व मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निव़णुकीतून बाहेर होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी राजस्थानमधील घडामोडींमुळे नाराज आहेत.
दरम्यान, राजस्थान काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे अशोक गहलोत यांचा काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून पत्ता कट झाल्यास इतर काही नेत्यांची नावं अध्यक्षपदासाठी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये के.सी. वेणुगोपाल, कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी शैलजा यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदामध्ये कुठलेही स्वारस्य नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, राजस्थान काँग्रेसमध्ये निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी पार्टी हायकमांडकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून सोनिया गांधी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. कमलनाथ यांचे अशोक गहलोत यांच्याशी चांगले संबंध आहेत.
दुसरीकडे राजस्थानमधील काँग्रेसच्या आमदारांनी घेतलेल्या बंडखोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हेही या बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर अजय माकन यांनी सांगितले की, जयपूरमध्ये रविवारी बोलावण्यात आलेली आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सहमतीनेच बोलावण्यात आली होती. आता मी आणि खर्गेंनी राजस्थानमधील घडामोडींबाबत सोनिया गांधींना सविस्तरपणे माहिती दिली आहे.