बाळासाहेब थोरातांच्या राजीनामा वृत्ताने काँग्रेस हायकमांड नाराज
By महेश गलांडे | Published: January 7, 2021 04:08 PM2021-01-07T16:08:33+5:302021-01-07T16:09:30+5:30
बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस वेणू गोपाळ यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं.
मुंबई - राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईकाँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड अलीकडेच हायकमांडने केली, त्यापाठोपाठ आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा हाय कमांडला मान्य नसल्याचे समजते.
बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस वेणू गोपाळ यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यासंदर्भात समजताच काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, बाळासाहेब थोरात यांना राजीनामा कुणी मागितला, ते का राजीनामा देत आहेत? असे प्रश्न सोनिया गांधींनी संबंधित नेत्यांना विचारले आहेत. पक्षाच्या संकटाच्या काळात सर्वाधिक साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात आहेत. मात्र, सध्या राज्यातील काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद असल्यानेच बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ इच्छित असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती, मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी केली आहे. त्यासाठी थोरात यांच्या दिल्लीवारीला महत्व प्राप्त झालं आहे. अलीकडेच मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली, त्यानंतर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीही सुरू केली आहे.
राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावं अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, हायकमांडचे मत वेगळेच असून बाळासाहेब थोरात यांच्याकडेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा असावी, अशी त्यांची इच्छा असल्याचं समजतंय.
नाना पटोले इच्छुक
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात मुख्यत: विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे, विदर्भात काँग्रेसला मिळालेलं यश पाहता विदर्भातून नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर तर मराठवाड्यातून अमित देशमुख यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे, बाळासाहेब थोरात हे कडवट काँग्रेसी आहेत, त्यांनी कधीही पक्षातील पदासाठी लॉबिंग केली नव्हती. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.
थोरातांच्या नेतृत्वातच विधानसभा लढली
थोरातांच्या नेतृत्वात काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती, प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा बाळासाहेब थोरात यांची भूमिका असली तरीही हायकमांड काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेब थोरात यांना पक्षाची वाढ करत सरकार सांभाळण्याची दुहेरी भूमिका सांभाळावी लागत होती, त्यामुळे आता जे नेतृत्व पुढे येईल ते सर्वमान्य असावं आणि त्याचसोबत आघाडी सांभाळण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणारं नेतृत्व देण्याचं आव्हान पक्षासमोर असणार आहे.