कधी येणार अच्छे दिन?; पोग्बाचा फनी व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची 'फ्री किक'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:00 PM2018-07-18T17:00:02+5:302018-07-18T17:00:33+5:30
भाजपच्या 'अच्छे दिनां'वर काँग्रेसचा अचूक निशाणा
मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी भाजपानं देशवासीयांना 'अच्छे दिन' आणण्याचं आश्वासन दिलं. खुद्द नरेंद्र मोदींनी त्यावेळी अनेक प्रचारसभांमध्ये 'अच्छे दिन'चा उल्लेख केला. त्यानंतर अच्छे दिन आयेंगे हे भाजपाचं घोषवाक्यच झालं. त्यामुळेच विरोधक भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांना कायम 'अच्छे दिन कब आयेंगे?', असा प्रश्न विचारतात. आता फुटबॉल विश्वचषकातील अंतिम सामन्याचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसनं भाजपाला 'अच्छे दिन'वरुन टोला लगावला आहे.
रविवारी फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. यामध्ये फ्रान्सनं क्रोएशियाला नमवत जगज्जेतेपद पटकावलं. या सामन्यानंतर फ्रान्सच्या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता. फ्रान्सचा स्टार खेळाडू पोग्बा अंतिम सामन्यानंतर जल्लोष करताना इकडे तिकडे मान वळवत काहीतरी शोधत होता. त्याच्या या अजब कृतीनं त्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. पोग्बा स्टेडियमचा कोपरा न कोपरा पाहत काहीतरी शोधत आहे, असं त्याच्या कृतीवरुन वाटत होतं. पोग्बाचा हाच अजब व्हिडीओ काँग्रेसनं ट्विटरवर शेयर केला आहे. 'कोणी अच्छे दिनाबद्दल विचारलं की पोग्बा आणि आमची अवस्था सारखीच असते,' असं ट्विट करत काँग्रेसनं 'अच्छे दिन'वरुन फ्री किक लगावली आहे.
Pogba and us, same feels. @paulpogbapic.twitter.com/rIOqjY6bqT
— Congress (@INCIndia) July 17, 2018
विशेष म्हणजे काँग्रेसनं या ट्विटमध्ये पोग्बाला टॅग केलं आहे. पोग्बाला भारतीय राजकारणाची आणि भाजपाच्या अच्छे दिनांच्या आश्वासनांची कल्पना आहे का, याची माहिती नाही. त्यामुळे काँग्रेसच्या ट्विटमध्ये आपल्याला टॅग करण्यात आलं आहे, याचं नोटिफिकेशन मिळाल्यावर पोग्बा संभ्रमात पडण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसच्या या फ्री किकला भाजपाला कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुकपूर्ण असेल.