मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी भाजपानं देशवासीयांना 'अच्छे दिन' आणण्याचं आश्वासन दिलं. खुद्द नरेंद्र मोदींनी त्यावेळी अनेक प्रचारसभांमध्ये 'अच्छे दिन'चा उल्लेख केला. त्यानंतर अच्छे दिन आयेंगे हे भाजपाचं घोषवाक्यच झालं. त्यामुळेच विरोधक भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांना कायम 'अच्छे दिन कब आयेंगे?', असा प्रश्न विचारतात. आता फुटबॉल विश्वचषकातील अंतिम सामन्याचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसनं भाजपाला 'अच्छे दिन'वरुन टोला लगावला आहे. रविवारी फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. यामध्ये फ्रान्सनं क्रोएशियाला नमवत जगज्जेतेपद पटकावलं. या सामन्यानंतर फ्रान्सच्या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता. फ्रान्सचा स्टार खेळाडू पोग्बा अंतिम सामन्यानंतर जल्लोष करताना इकडे तिकडे मान वळवत काहीतरी शोधत होता. त्याच्या या अजब कृतीनं त्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. पोग्बा स्टेडियमचा कोपरा न कोपरा पाहत काहीतरी शोधत आहे, असं त्याच्या कृतीवरुन वाटत होतं. पोग्बाचा हाच अजब व्हिडीओ काँग्रेसनं ट्विटरवर शेयर केला आहे. 'कोणी अच्छे दिनाबद्दल विचारलं की पोग्बा आणि आमची अवस्था सारखीच असते,' असं ट्विट करत काँग्रेसनं 'अच्छे दिन'वरुन फ्री किक लगावली आहे.
कधी येणार अच्छे दिन?; पोग्बाचा फनी व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची 'फ्री किक'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:00 PM