शीलेश शर्मा -
नवी दिल्ली : महागाईविरुद्धकाँग्रेस देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत अंतिम टप्प्यात नवी दिल्लीत महारॅली आयोजित करणार आहे. १२ डिसेंबर रोजी एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असताना दुसरीकडे काँग्रेसची दिल्लीत महारॅली निघणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे संघटन प्रभारी महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली.
संसद अधिवेशनाच्या काळात आयोजित या महारॅलीचा उद्देश असा आहे की, महागाईचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जाणे आणि मोदी सरकारवर दबाव आणणे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हे शक्तिप्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
वेणुगोपाल म्हणाले...- या महारॅलीला महागाई हटाओ रॅली असे नाव देण्यात आले आहे. याची घोषणा करताना के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या काळातील महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. प्रत्येक कुटुंबाचे बजेट कोलमडले आहे. मात्र, मोदी सरकार डोळेझाक करत आहे. - लोकांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार मीडियातील एका वर्गाची मदत घेऊन जनतेच्या महत्त्वपूर्ण मुद्यांवरुन लक्ष धार्मिक आदी मुद्यांकडे भटकाविण्याचा प्रयत्न करत आहे. - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आवाहनावर काँग्रेस पक्ष या विषयावर आपला विरोध दर्शवित आहे. हे मुद्दे आम्ही संसदेत आणि बाहेर उपस्थित करत राहू.