"तू-तू मैं-मैं होतच राहते, ममता बॅनर्जींना पहिल्यांदा काँग्रेसने खासदार केलं अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 10:25 AM2024-02-24T10:25:26+5:302024-02-24T10:30:21+5:30
काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 'एकला चलो रे'ची घोषणा केली आहे. TMC नेते डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी सांगितलं की, ममता बॅनर्जी यांचा पक्ष राज्यातील सर्व 42 लोकसभा जागांवर एकटाच लढणार आहे. पण काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "टीएमसीसोबत चर्चा सुरू आहे. भाजपाला पराभूत करणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. तू-तू-मैं-मैं होतच राहते."
"काँग्रेस पक्षानेच ममता बॅनर्जी यांना पहिल्यांदा खासदार केलं. त्यांच्या पक्षाचं नाव देखील पाहा. त्यात तृणमूल आणि काँग्रेसही आहे. टीएमसीसाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. आम्ही ममता बॅनर्जींचा आदर करतो. आमच्या अपेक्षेनुसार, पलटीराम (नितीश कुमार) आणि आरएलडी वगळता, इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले सर्व 26 पक्ष एकत्र आहेत."
#WATCH | Moradabad, Uttar Pradesh | On seat sharing with TMC, Congress General Secretary in-charge Communications, Jairam Ramesh says, "Discussions are underway. Our doors are always open for TMC. Mamata Banerjee and TMC have said that they want to strengthen INDIA Alliance and… pic.twitter.com/7LkMeeoa0e
— ANI (@ANI) February 24, 2024
जयराम रमेश यांनी "विशेष म्हणजे यूपीमध्ये अधिकृत घोषणा झाली आहे... ती अंतिम व्हायला वेळ लागला. आज आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसही अधिकृत घोषणा करत आहेत. काँग्रेस आळशी असून त्यांना आघाडीत रस नाही, असं वारंवार सांगितलं जात होतं. पण मी नेहमी म्हणालो की, वेळ लागतो. दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा आणि चंदीगडमध्ये जागावाटपाबाबत आप आणि काँग्रेस आज पत्रकार परिषद घेणार आहेत" असं म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'सोबत जयराम रमेश उत्तर प्रदेशमध्ये उपस्थित आहेत. या यात्रेतील अखिलेश यादव यांच्या सहभागाबाबत ते म्हणाले, आम्ही आशा करतो की अखिलेश यादव 25 फेब्रुवारीला आग्रा येथील न्याय यात्रेत सहभागी होतील. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. याच दरम्यान, प्रियंका गांधी आज राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी हापूरला पोहोचल्या. यापूर्वी त्या वाराणसीतील यात्रेत सहभागी होणार होत्या, मात्र प्रकृती बरी नसल्यामुळे त्या सहभागी होऊ शकल्या नाहीत.