Congress in ByPoll Elections : विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस निराश झाली आहे. झारखंडमध्ये काँग्रेसने १६ जागा जिंकल्या असल्या तरी महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवून फक्त १६ जागांवर यश मिळवता आलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी काँग्रेसला २८ जागा कमी मिळाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या शेजारील राज्य मध्य प्रदेशातील विजयपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाची सध्या जोरदार चर्चा आहे. काँग्रेस उमेदवाराने विद्यमान कॅबिनेट मंत्री आणि भाजपच्या आमदारावर दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दलही कौतुक केलं जात आहे. नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला निसटता विजय मिळाला आहे.
विजयपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुकेश मल्होत्रा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर राम निवास रावत हे भाजपकडून या जागेवरून निवडणूक लढवत होते. राम निवास हे सहा वेळा आमदार झाले आहेत. यापूर्वी तेही काँग्रेसमध्ये होते. पण एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पक्षांतरविरोधी कायद्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली. राम निवास यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना मध्य प्रदेश सरकारमध्ये वन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
मात्र आता त्यांचा पोटनिवडणुकीत ७,३६४ मतांनी पराभव झाला. १६ फेरीच्या मतमोजणीदरम्यान ते पुढे होते, पण शेवटी चित्र पालटलं. मुरैना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सत्यपाल सिंग सिकरवार (नीतू) यांना उमेदवारी दिल्यामुळे राम निवास यांनी काँग्रेस सोडली होती. उमेदवारी न मिळाल्याने ते संतापला होते. मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे कारण म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली होती.
महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र वसंतराव चव्हाण १४५७ मतांनी विजयी झाले आहेत. भाजपचे उमेदवार संतुकराव हुंबर्डे हे ३५ हजार मतांनी आघाडीवर होते, मात्र शेवटच्या काही फेऱ्यांनी संपूर्ण निवडणूकच बदलून टाकली. काँग्रेसला ५८६७८८ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार हंबर्डे यांना ५८५३३१ मते मिळाली.
ही जागा काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन महिन्यांतच काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या मुलाला येथून उमेदवारी दिली होती. भाजपने येथून संतुकराव हुंबर्डेयांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर दिल्ली भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड लोकसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला होता. भाषणादरम्यान त्यांनी दावा केला की, नांदेडमधील विजयामुळे महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या ९ वरून १० झाली. मात्र, तोपर्यंत या जागेचा अंतिम निकाल जाहीर झाला नव्हता. पंतप्रधानांच्या भाषणाच्या काही वेळानंतर निकाल आला ज्यामध्ये भाजपने ही जागा गमावली.