नवी दिल्ली - देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अडचणी सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आज पक्षाचे तरुण प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीनामा दिला. तसेच राजीनामा देताना एक पत्र लिहून गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली. शेरगिल यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, मला हे सांगताना दु:ख होते की, निर्णय घेणे आता जनता आणि देशाच्या हितासाठी नाही आहे तर हे त्या लोकांच्या स्वार्थी हितांनी प्रभावित झाले आहे जे चाटुकारिता, चमचेगिरी आणि खुशमस्करेगिरीमध्ये गुंतले आहेत. तसेच ते सातत्याने वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहेत.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर शेरगिल यांनी सांगितलं की, काही लोकांसाठी काँग्रेस हे घर आहे. काही लोकांचं घर काँग्रेसमुळे चालतं आणि पक्षामध्ये अशाच लोकांची वर्णी लागत आहे. मात्र काँग्रेस माझं घर होतं आणि माझं घर काँग्रेसमुळे चालत नाही.
जयवीर शेरगील यांना राजीनामा देण्याचं प्राथमिक कारण सांगताना लिहिकं की, काँग्रेसमध्ये निर्णय घेणाऱ्या सध्याच्या लोकांची विचारसरणी आणि दूरदृष्टी आता तरुण आणि आधुनिक भारताच्या आशाआकांक्षांच्या अनुरूप राहिलेली नाही. तसेच हे लिहिताना मला दु:ख होते की, पक्षात आता निर्णय जनता आणि देशाच्या हितासाठी घेतले जात नाहीत, तर हे निर्णय खुशमस्करेगिरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे स्वार्थ आणि वैयक्तिक हितांचा प्रभाव त्यावर असतो. तसेच वास्तवाकडे दुर्लक्ष केले जाते. ही अशी परिस्थिती आहे जी मी नैतिक रूपाने स्वीकार करू शकत नाही. तसेच मी अशा परिस्थितीत काम करणे सुरू ठेवू शकत नाही.