नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्गामुळे अनेक परिवार उध्वस्त झाली आहेत. कित्येकांनी आपले जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ठ आणि आई-वडिलांनाही गमावलं आहे. मुले लहान असतानाच आई-वडिलांचं छत्र हरवल्याने कित्येक कुटुंबातील चिमुकली अनाथ बनली आहेत. या अनाथांना आधार देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, पण कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची मागणी केली आहे.
कोरोना महामारीत देशातील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक युवक, शाळकरी मुलांना आपल्या आई-वडिलांना गमावलंय. तर, अनेकांनी आपले पालकच या संकाटात गमावले आहेत. त्यामुळे, अशा अनाथ मुलांना भविष्याील शिक्षणासाठी आधारच उरला नाही. त्यामुळे, या मुलांच्या मदतीसाठी सोनिया गांधींनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. आपणास ज्ञात आहेच, माझे पती स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात नवोदय विद्यालयांची स्थापना केली. देशाच्या ग्रामीण भागातील युवकांना उच्च दर्जाचं, सोयीचं, आधुनिक आणि परवडणार शिक्षण मिळावं, हेच त्यांचं स्वप्न होतं. सध्या देशात 661 नवोदय विद्यालय आहेत.
मध्य प्रदेशात दरमहा 5 हजार पेन्शन
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात येईल. या मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांच्या कुटूंबियांना मोफत रेशनचीही व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंबे मोडली आहेत, तर काहीनी आपल्या म्हातारपणाची काठी गमावली आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या कुटुंबांना सरकारकडून दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.