भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 09:03 PM2024-10-08T21:03:50+5:302024-10-08T21:07:49+5:30

"दलित आदिवासी समाजाने हे विसरता कामा नये की, काँग्रेसनेच त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार केले आहेत. काँग्रेसनेच त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित ठेवले."

Congress involved in anti-India conspiracy; Trying to weaken the society, PM Modi's attack | भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात

भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात

PM Narendra Modi on Jammu Kashmir &  Haryana Election Results 2024 : आज जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली, तर हरयाणात एकहाती सत्ता मिळवली. विशेष म्हणजे, हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

हरियाणाच्या जनतेने नवा इतिहास रचला
भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी म्हणाले की, हरयाणातील जनतेने आज एक नवा इतिहास रचला आहे. हरियाणाची स्थापना 1966 मध्ये झाली, तेव्हापासून मोठ्या दिग्गजांनी या राज्यावर राज्य केले. एक काळ असा होता की, हरयाणातील दिग्गज नेत्यांची नावे संपूर्ण देशात प्रसिद्ध होती. हरियाणात आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी 10 निवडणुकांमध्ये हरयाणातील जनतेने दर पाच वर्षांनी सरकार बदलले. पण, यावेळी हरियाणातील जनतेने जे केले, ते अभूतपूर्व आहे. हरयाणाच्या लोकांनी चमत्कार केला आणि भाजपला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. आज नवरात्रीचा सहावा दिवस, म्हणजेच माँ कात्यायनीचा दिवस आहे. आई हातात कमळाचे फुल धरून आपल्याला आशीर्वाद देते. अशा या शुभदिनी हरियाणात सलग तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे.

भारताविरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रात काँग्रेस नेते सामील 
पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आज हरियाणाने काँग्रेसला स्पष्ट संदेश दिला आहे की, देशविरोधी राजकारण चालणार नाही. हरयाणातील प्रत्येक समाजाने, प्रत्येक कुटुंबाने एकजुटीने मतदान केले. देशभक्तीने भरभरून मतदान केले. हरयाणाने देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा डाव हाणून पाडला. भारताची शांतता नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले जात आहेत, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे साथीदार या खेळात सामील आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला. 

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन फिरणारे....
काँग्रेस जाती-जातींमध्ये विष कालवत आहे. जे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन फिरत आहेत, ते जातीच्या नावावर लोकांना भडकवत आहेत. दलित आदिवासी समाजाने हे विसरता कामा नये की, काँग्रेसनेच त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार केले आहेत. काँग्रेसनेच त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित ठेवले. हे तेच लोक आहेत, जे सत्तेवर आल्यास एकाही गरीब दलित आदिवासीला पंतप्रधान होऊ दिले नाहीत. काँग्रेस परिवार दलित आणि मागास आदिवासींचा द्वेष करते. काँग्रेस आरक्षण संपवणार होते. हरियाणात सरकार स्थापन झाल्यास ती हेच करणार होते. समाज कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हरियाणातील शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न झाला, पण शेतकऱ्यांनी हा हाणून पाडला, अशी टीकाही मोदींनी केली. 

काँग्रेसला नो एंट्री...
पीएम मोदी पुढे म्हणाले की, भाजप हा फक्त जगातील सर्वात मोठा पक्षच नाही, तर हा बहुतेकांच्या हृदयात स्थिरावला आहे. हरियाणात जनतेने विकासाच्या मुद्द्यावर हॅट्ट्रिक केली आहे. जिथे जिथे भाजपचे सरकार बनते, तिथली जनता पुन्हा पुन्हा भाजपलाच निवडते. काँग्रेसने किती वर्षांपूर्वी सत्तेत पुनरागमन केले होते? देशात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे 50 ते 60 वर्षांपूर्वी काँग्रेस सत्तेत होती, परंतु लोकांनी त्यांना एकदाही परत येऊ दिले नाही. अनेक राज्यांनी काँग्रेससाठी नो एंट्रीचे बोर्ड लावले. 

काँग्रेस हा परजीवी पक्ष, आपल्याच मित्रांना खातो...
पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, काँग्रेस हा असा परजीवी पक्ष आहे, जो आपल्याच मित्रपक्षांना गिळंकृत करतो. काँग्रेसला असा देश घडवायचा आहे की, जिथे लोक स्वतःच्या वारशाचा तिरस्कार करतील. देशवासीयांना ज्याचा अभिमान आहे, ते त्यांना कलंकित करायचे आहे. निवडणूक आयोग असो, देशाची सेना असो, न्यायव्यवस्था असो. काँग्रेसला प्रत्येक संस्था कलंकित करायची आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही या लोकांनी गदारोळ केला होता. निवडणूक आयोगाच्या घटनात्मक निष्पक्षतेला आव्हान देण्यासाठी त्यांचे शहरी नक्षलवादी सोबती सर्वोच्च न्यायालयात गेले. आजही काँग्रेसने देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी बोचरी टीकाही मोदींनी केली.

भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही
केंद्र असो वा हरियाणा, गेल्या 10 वर्षांत भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. जनतेच्या विकासासाठी आम्ही केवळ समर्पित भावनेने काम केले. यासाठी मी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. हरियाणाच्या विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. चांगल्या हेतूचे आणि चांगल्या धोरणांचे कौतुक केले तर काम करण्याची ऊर्जाही द्विगुणित होते. जम्मू-काश्मीरच्या जनतेने भाजपच्या लोकांना प्रोत्साहन दिले आहे. हा आशीर्वाद आपल्याला अधिक चांगले करण्याची प्रेरणा देतो.
 

Web Title: Congress involved in anti-India conspiracy; Trying to weaken the society, PM Modi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.