नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालांचे कल पाहता काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. पण, यादरम्यान काँग्रेसला 'ऑपरेशन लोटस'च्या भीती वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आपल्या विजयी आमदारांना हिमाचल प्रदेशमधून राजस्थानला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे शिमल्याला रवाना झाल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल हे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे वरिष्ठ निरीक्षक होते. राजीव शुक्लाही त्यांच्यासोबत हिमाचलला पोहोचणार आहेत. काँग्रेसला आपल्या आमदारांचा घोडेबाजार होण्याची भीती आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशात काँग्रेस विजयी झाल्यास जनतेच्या हिताची सर्व कामे करू, असे काँग्रेसचे दिग्गज नेते राजीव शुक्ला म्हणाले आहेत. तसेच, ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली. हिमाचलमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. तर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी सांगितले की, आतापर्यंतचे कल पाहता काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये सरकार स्थापन करणार आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालांच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस 39 जागांवर तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे. निकालाच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. याचबरोबर, अपक्ष उमेदवार 3 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या आधीच राजस्थानमध्ये पोहोचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या रणथंबोर येथील हॉटेल शेरबागमध्ये राहणार आहे. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी राजस्थानमध्ये हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या विजयी आमदारांना भेटू शकतात.