गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यावर एकमत असलं तरी जागावाटपावरून अनेक घटकपक्षांमध्ये एकमत होत नाही आहे. दरम्यान, बिहारमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाल्यानंतर आता काँग्रेसने आज आम आदमी पक्षासोबत बैठक घेतली असून, या बैठकीत आम आदमी पक्षासोबत जागावाटप करण्यासाठी कांग्रेसने मवाळ भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये आम आदमी पक्षाकडून सौरभ भारद्वाज, आतिशी मार्लेना आणि खासदार संदीप पाठक हे सहभागी झाले होते. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. ते म्हणाले की, बैठक खूप सकारात्मक झाली. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या प्रतिनिधींना पाठवले होते. बैठकीत दोन अडीच तास चर्चा झाली. पुढेही चर्चा सुरू राहील. काही दिवसांनंतर आम्ही पुन्हा भेटू त्यामध्ये आम्ही जागावाटपाला अंतिम रूप देणार आहोत. मात्र बैठकीतील सविस्तर तपशील देण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. या बैठकीनंतर कांग्रेसचे नेते मुकूल वासनिक यांनी सांगितले की, आज काय चर्चा झाली याबाबत माहिती देऊ शकणार नाही. तुम्ही थोडी वाट पाहा, लवकर सर्व माहिती दिली जाईल. दोन्ही पक्ष इंडिया आघाडीतील महत्त्वाचे पक्ष आहेत. आम्ही एकत्र निवडणुका लढणार आहोत आणि भाजपाला पराभूत करणार आहोत, असे सांगितले.
काँग्रेस आणि आपने एकत्र निवडणूक लढवण्याबाबत सध्या कुठलीही घोषणा केलेली नाही. मात्र पंजाब आणि दिल्लीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवतील, असा अंदाज आहे. त्याबरोबरच गुजरातमध्येही काँग्रेस आम आदमी पक्षाला काही जागा सोडू शकते. दरम्यान, कोण कुठल्या जागांवर लढेल याची घोषणा पुढच्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच संयुक्त प्रचाराची रूपरेषाही तयार केली जाऊ शकते.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांकडून जागावाटपासाठी काँग्रेसवर दबाव आणण्यात येत आहे. त्यामुळे जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मुकुल वासनिक आणि सलमान खुर्शिद यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे.