काँग्रेसला लोकसभा जागावाटपाची घाई नाही, तूर्त ५ विधानसभा निवडणुकांवर लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 08:15 AM2023-09-15T08:15:40+5:302023-09-15T08:16:08+5:30
Congress : आपला पक्ष विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी काही जागा त्याग करण्याच्या मार्गात येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगितले असले तरी याबाबत अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - आपला पक्ष विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी काही जागा त्याग करण्याच्या मार्गात येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगितले असले तरी याबाबत अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीमध्येही जागावाटपाच्या मुद्यावर फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. लोकसभेच्या जागावाटपाची कोणतीही चर्चा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निकालावर परिणाम करील, असा संदेश काँग्रेसने दिला आहे. राजस्थान आणि छत्तीसगड आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी व म. प्रदेश जिंकण्यासाठी पक्ष कामाला लागला आहे.
फॉर्म्युला तयार होणार
इंडिया आघाडीची १२ पक्षांची समन्वय समिती लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात व्यग्र आहे. आता राज्यांची चार राज्यांमधये विभागणी केली जात आहे. त्यातील प्रथम म्हणजे ज्या राज्यांत काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षात आहे किंवा सत्तेत आहे अशी राज्ये - मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, गोवा, तेलंगणा, आसाम, ईशान्येतील काही भाग, पंजाब, हरियाणा आदी.
प. बंगालमध्ये काँग्रेस-डावे पक्ष आपापला जनाधार शोधत आहेत. याशिवाय महाराष्ट्र, तामिळनाडू यासारखी राज्ये आहेत, जेथे पक्ष राष्ट्रवादी, द्रमुकबरोबर सत्तेत किंवा सत्तेबाहेर आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डावे यांच्यातच सर्व काही आहे.