Citizenship Amendment Act: केंद्रातील भाजप सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्या(CAA)वरुन विरोधकांच्या INDIA आघाडीत दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (CM Pinarayi Vijayan) यांनी गुरुवारी (11 एप्रिल) CAA बाबत मौन बाळगल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस, RSS आणि भाजप सारखीच मानसिकता दाखवतात, असा आरोप त्यांनी केला.
'सीएएवर काँग्रेस आणि राहुल गांधी मौन'केंद्रातील भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या I.N.D.I.A. आघाडीतील सीपीआय(एम) चे नेते पिनाराई विजयन यांनी आरोप केला की, सीएएला विरोध करण्यासाठी डाव्या आघाडीसोबत आलेल्या काँग्रेसच्या केरळ युनिटने राष्ट्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून यातून माघार घेतली. सीएएबाबत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मौन बाळगल्याचा आरोप सीएम विजयन यांनी केला. ते अटिंगल लोकसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार व्ही जॉय यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सीएएबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. अमेरिकेसह अनेक देशांनी सीएएवर टीका आणि विरोध केला, परंतु काँग्रेसने त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही किंवा आरएसएस आणि भाजपच्या अजेंड्याला विरोध केला नाही, असेही विजयन म्हणाले.
काँग्रेसच्या तक्रारीवरुन केजरीवाल तुरुंगातजेव्हा काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई केली जाते, तेव्हाच ते ईडी, आयकर आणि इतर तपास यंत्रणांविरोधात आवाज उठवतात. अरविंद केजरीवाल आणि सीपीआय (एम) नेते थॉमस आयझॅक यांचे उदाहरण देत ते म्हणाले की, इतर पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जाते तेव्हा काँग्रेस गप्प बसते. अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीच्या कारवाईचे कारण दिल्ली मद्य धोरण प्रकरणी काँग्रेसने दाखल केलेली एफआयआर आहे, असा दावाही त्यांनी केला.