सचिन पायलट यांच्या उपोषणाने काँग्रेस नाराज, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 08:24 PM2023-04-12T20:24:50+5:302023-04-12T20:26:48+5:30
पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदरसिंग रंधावा यांनी स्वतः यासंदर्भात संकेत दिले आहेत. रंधवा म्हणाले, त्यांनी (सचिन पायलट) मुद्दा बरोबर उचलला, मात्र त्यांची पद्धत चुकीची होती. खरे तर, यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, पण ती झाले नाही, आता होईल.
नवी दिल्ली - काँग्रेस पक्ष राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात आघाडी उघडणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदरसिंग रंधावा यांनी स्वतः यासंदर्भात संकेत दिले आहेत. रंधवा म्हणाले, त्यांनी (सचिन पायलट) मुद्दा बरोबर उचलला, मात्र त्यांची पद्धत चुकीची होती. खरे तर, यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, पण ती झाले नाही, आता होईल.
असे झालेच, तर सचिन पायलट बॅकफूटवर जाऊ शकतात. खरे तर, काँग्रेसकडून पायलट यांचे उपोषण ‘पक्ष विरोधी’ कारवाई असल्याचे सांगूनही, प्रदेश प्रभारी नाखूश आहेत. यासंदर्भात रंधावा यांनी बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली. तसेच, आपण राजस्थानला पंजाब होऊ देणार नाही, असे म्हटले आहे.
राजस्थान काँग्रेस प्रभारी रंधावा म्हणाले, ते सध्या सचिन पायलट यांचे उपोषण आणि यानंतर त्यांनी माध्यमांसोबत साधलेल्या संवादाचे अधयन करत आहेत आणि थोड्याच दुवसांत पुढील पवले उचलली जातील. माध्यमांतील वृत्तांनुसार, रंधावा यांनी खरगे यांना भेटून या प्रकरणाची प्राथमिक माहिती दिली आहे. तसेच ते गुरुवार सकाळी साडे 10 वाजता पुन्हा एकदा खरगे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पायलट यांच्यावरील कारवाईसंदर्भात मोहर लागेल. मात्र, पायलट यांची प्रियांका गांधी यांना भोटायची इच्छा आहे. यानंतरच अंतीन निर्णय होईल.
...म्हणून केले होते उपोषण -
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत, 11 एप्रिलरोजी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत जयपूरच्या शहीद स्मारकावर एक दिवसीय ‘उपोषण’ केले होते.