आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा बांगलादेशमधील हिंदूंपेक्षा गाझाबाबत अधिक चिंतीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी रांची येथे आले होते.
बांगलादेशमधील अशांततेबाबत चिंता व्यक्त करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, बांगलादेशमधील परिस्थिती खूपच वाईट आहे. त्या परिस्थितीचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. केंद्र सरकार मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा करेल. हिमंता बिस्वा सरमा यांनी बिरसा मुंडा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं.
यावेळी काँग्रेसला टीकेचं लक्ष्य करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी गाझामधील अल्पसंख्याकांसाठी आंदोलन केलं. मात्र बांगलादेशमधील हिंदूंसाठी त्यांनी कितीवेळा आवाज उठवलाय? जगभरात समस्यांचा सामना करत असलेल्या मुस्लिमांसोबत आपण उभे आहोत, मात्र हिंदूंच्या सोबत नाही, हे काँग्रेसने दाखवून दिले आहे, अशी टीका सरमा यांनी केली.
बांगलादेशमधून होत असलेल्या लोकांच्या पलायनाबाबत हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, केंद्र सरकारने कुणालाही सीमा पार करण्याची परवानगी दिलेली नाही. या प्रश्वावर हा तोडगा असू शकत नाही. मुत्सद्देगिरीच्या माध्यमाचा वापर करणं आणि बांगलादेशमधील त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणं, हाच यावरील उपाय आहे. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या पूर्ण पूर्व क्षेत्रात हिंदूंच्या संख्येत घट झाली आहे. आसाममध्ये हिंदू लोकसंख्या ९.२३ टक्क्यांनी घटली आहे. तर बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या १३.५ टक्क्यांनी घटली आहे.