काँग्रेसने कॉल डेटा रेकॉर्डचा मुद्दा राज्यसभेत केला उपस्थित; रविशंकर यांनी आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:16 AM2020-03-20T06:16:50+5:302020-03-20T06:17:17+5:30
देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.
नवी दिल्ली : दूरसंचार विभागाकडून कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) मागण्याचा मुद्दा काँग्रेसने राज्यसभेत उपस्थित केला. देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.
काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर चर्चेसाठी नियम २६७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी नोटीस अस्वीकार करीत त्यांना शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली. तथापि, काँग्रेसने केलेला आरोप फेटाळून लावत कायदा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, कॉल ड्रॉप समस्या दूर करण्यासाठी आणि दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी सीडीआर मागण्यात आले आहेत. कॉल रेकॉर्डशी संबंधित विविध तरतुदींचा उल्लेख करीत आनंद शर्मा म्हणाले की, असा कोणताही नियम नाही ज्याआधारे सरकारी विभागांना नियमितपणे सीडीआर मागता येतील. देशातील लोकांवर निगराणी राज प्रभावी होताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, मी आश्वासन देऊ इच्छितो की, कोणतीही पाळत ठेवली जात नाही. फोन टॅपिंग होत नाही.